तिघा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने पाच लाखांची अनामत काढल्याचा प्रकार

By अजित मांडके | Published: January 17, 2024 03:34 PM2024-01-17T15:34:38+5:302024-01-17T15:35:20+5:30

भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार.

the type of withdrawal of deposit of five lakhs with forged signatures of three officials | तिघा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने पाच लाखांची अनामत काढल्याचा प्रकार

तिघा अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने पाच लाखांची अनामत काढल्याचा प्रकार

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तीन अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून महापालिकेच्या लेखा विभागाकडून ५ लाख १० हजार २५१ रुपये सुरक्षा अनामत रक्कम काढून घेतल्याप्रकरणी तिघा आरोपींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी भाजप ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात पाच महिन्यानंतरही महापालिकेने कठोर कारवाई केली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

महापालिकेने २०१७ मध्ये वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध शौचालयांची दुरुस्ती करणे या कामाचा १ कोटी ७७ लाख ५२ हजार रुपयांचा ठेका दिला होता. या ठेकेदाराची महापालिकेत ५ लाख १० हजार २५१ रुपये अनामत रक्कम जमा होती. संबंधित रक्कम काढून घेण्यासाठी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता सुधीर सोनवणे, उप अभियंता शैलेंद्र चारी आणि कार्यकारी अभियंता प्रकाश खडतरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून आणि ठेकेदाराकडील मूळ पावती सादर करून पैसे कंत्राटदाराच्या खात्यात जमा करण्यात आले होते.

या प्रकरणी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या १२ मे २०२३ रोजी तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणाची महापालिकेने चौकशी केली. त्यावेळी तीन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून अनामत रक्कम जमा करून घेण्यात आल्याचे सिद्ध झाले. या संदर्भात वर्तकनगर प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने १७ मे २०२३ रोजी नगर अभियंता यांच्या कार्यालयाकडे अहवाल पाठविला. तसेच  संबंधित ठेकेदाराला  ११ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. तर संबंधित तीन अधिकाऱ्यांनी २ ऑगस्ट रोजी संबंधितांविरोधात लेखा विभागाकडून कारवाई करण्याची विनंती केली होती. मात्र, लेखा व वित्त विभागाने १७ ऑगस्ट रोजी बनावट स्वाक्षऱ्या झालेल्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर तक्रार दाखल करण्याची सुचविले आहे. या प्रकरणी पाच महिन्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झालेली नाही, असे वाघुले यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: the type of withdrawal of deposit of five lakhs with forged signatures of three officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.