भिवंडीमध्ये अपघातात चार वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू, शहरातील अवजड वाहतूकीचा प्रश्न ऐरणीवर!
By नितीन पंडित | Published: October 30, 2023 06:30 PM2023-10-30T18:30:06+5:302023-10-30T18:30:18+5:30
हबीबा अफसर खान असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चार वर्षीय चिमुरडीचे नाव आहे.
भिवंडी : रस्ता ओलांडताना वाहनाने दिलेल्या धडकेत चार वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अवचित पाडा चाविंद्रा येथे सोमवारी घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संतप्त होत काही काळ वंजरपट्टी चावीन्द्रा रस्ता बंद केला होता. हबीबा अफसर खान असे अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चार वर्षीय चिमुरडीचे नाव आहे.
शहरातील अवचित पाडा चाविंद्रा या ठिकाणी ती रस्ता ओलांडत असताना हबीबा हिला कंटेनरने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर माजी उपमहापौर अहमद सिद्दीकी,जावेद फारुखी यांसह स्थानिक नागरीक घटनास्थळी एकत्रित होत अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी वाहतूक विभागाला करीत एकच गोंधळ घातला होता.त्या नंतर पोलिसांनी सर्वांची समजूत काढून त्यांना बाजूला करून मार्ग मोकळा केला.दरम्यान चिमुरडीचा मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.तर पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे व वाहतूक विभगाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी शहरातील अवजड वाहतुकी संदर्भात मंगळवारी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना मनाई असताना सुद्धा शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने मार्गक्रमण करीत असतात आणि यामुळेच मागील महिन्यात तब्बल तीन जणांचा अपघाती दुर्दैव मृत्यू झाला होता.त्यानंतर शहरातील अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करावी अशी ओरड सर्वांनी केली.पण त्यानंतर ही भिवंडी शहरातील अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याने सोमवारी पुन्हा एकदा या अवजड वाहनाच्या धडकेमुळे एका चार वर्षे चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे.