पीडित दाम्पत्याची कुवैतमधील कामाच्या जाचातून सुटका; भाईंदरच्या भरोसा सेलची मोठी कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 01:00 PM2022-07-07T13:00:28+5:302022-07-07T13:16:50+5:30

Couple Captive in Kuwait Returns Home : मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर येथील भरोसा सेलकडे ज्योती पांडे या महिलेने तक्रार अर्ज दिला होता.

The victim couple was released from work in Kuwait, By the Help of Bhayander Bharosa Cell | पीडित दाम्पत्याची कुवैतमधील कामाच्या जाचातून सुटका; भाईंदरच्या भरोसा सेलची मोठी कामगिरी 

संग्रहित छायाचित्र.

Next

मीरारोड - चांगल्या पगाराच्या हेतूने कुवैत येथे घरकामासाठी गेलेल्या दाम्पत्याचा छळ होऊन, उलट त्यांच्यावरच तेथे कामगार न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्या पीडित दाम्पत्यास भारतीय दूतावासाच्या मदतीने भाईंदरच्या भरोसा सेलने सुखरूप मायदेशी आणले आहे . 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या भाईंदर येथील भरोसा सेलकडे ज्योती पांडे या महिलेने तक्रार अर्ज दिला होता. तिच्याकडे पूर्वी घरकाम करणारी विजयालक्ष्मी ( ४०) नावाची महिला पती हरेश ( ४२ ) रा. मीरारोड हे दाम्पत्य एका एजंट मार्फत कुवैत येथे ५ एप्रिल २०२२ रोजी घरकाम व मुलांचा सांभाळ करण्यासाठी गेले होते. २ लहान मुलांचा सांभाळ, घराची सर्व साफसफाई , जेवण आदी कामासाठी त्यांना प्रत्येकी ४० हजार पगार ठरवण्यात आला होता . 

परंतु प्रत्यक्षात ते दाम्पत्य जेव्हा  कुवैत येथील घरमालक मोसाब अब्दुल्ला यांचे घरी कामासाठी गेले तेव्हा त्यांच्या घरामध्ये ९ लहान मुलांना सांभाळणे , ५ ते ६ खोल्या व हॉलची साफसफाई करणे, जेवण बनवणे आदी काम करावे लागत होते . रोज सकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजे पर्यंत असे तब्बल २२ तास त्यांना राबवून घेतले जात होते . सततच्या कामाच्या त्रासा मुळे विजयालक्ष्मी यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती खराब होऊन त्यांना फिट आल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. 

विजयालक्ष्मी यांनी ज्योती यांना समाज माध्यमातून स्वतःचे रुग्णालयातील फोटो पाठवून कुवैतमधील मालक त्यांना घराबाहेर सोडत नसल्याचे व त्यांचा मोबाईल काढून घेवून त्यांना घरातच बंद करून ठेवत असल्याचे सांगितले. आपणास परत भारतात यायचे असल्याने मदतीची विनंती ज्योती यांच्याकडे केली. यानंतर, भरोसा सेल ने आफ्रिकेतून एका पीडित महिलेस सोडवून आणल्याची वृत्तपत्रातील बातमी वाचण्यात आली असल्याने ज्योती यांनी भरोसा सेलकडे तक्रार दिली होती. 

भरोसा सेलच्या सहायक निरीक्षक तेजश्री शिंदे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांना माहिती दिली . उपायुक्त विजयकांत सागर व मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदेंसह सचिन तांबवे, समृद्धी भगत, आफ्रिन जुनैदी यांनी दाम्पत्यास मदत करण्यासाठी पावले उचलली. 

यानंतर, कुवैतमधील भारतीय दूतावासशी संपर्क साधला असता, संबंधित दाम्पत्याने कामाचा करारनामा केल्याने त्याप्रमाणे कामाची वेळ पूर्ण करावीच लागेल, मात्र पिडीत स्वत:हून भारतीय दूतावासात आले तर त्यांना मदत करू शकू, असे सांगण्यात आले . परंतु घर मालक सदर दाम्पत्यास बाहेर जाऊ देत नसल्याने अखेर २० जून रोजी ते भाजीपाला खरेदीच्या बहाण्याने बाहेर पडले व भारतीय दूतावासात दाखल झाले. 

दूतावासाने त्यांना आश्रय दिला व दाम्पत्यास दोन दिवसांनी कुवैत येथील कामगार न्यायालयात हजर केले. मात्र, न्यायालयात त्यांच्या विरुद्धच गुन्हा दाखल करून मालक मोसाबा याने न्यायालयात येऊन दाम्पत्याचे पासपोर्ट सादर केले. त्यावेळी न्यायालयाने ४ जुलै पर्यंत दाम्पत्याने स्वखर्चाने परत भारतात जावे अन्यथा मालकाचा जबाब नोंदवून दावा चालवला जाईल, असे निर्देश दिले. त्यानंतर भरोसा सेलने पीडित दाम्पत्याचे तिकीट काढण्या पासून आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून ५ जुलै रोजी दाम्पत्यास भारतात परत आणले . 

घरकामाच्या मोबदल्यात चांगले पैसे मिळतील या अपेक्षेने भारतातून अनेकजण परदेशात जातात. परंतु तेथील कायदे नियम व करारातील अटीशर्ती आदींची शहनिशा न केल्याने त्यांचा छळ होऊन तेथेच अडकून पडतात. त्यामुळे सर्व माहिती घेऊनच परदेशात कामासाठी जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे . 
 

Web Title: The victim couple was released from work in Kuwait, By the Help of Bhayander Bharosa Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.