ठाण्यात इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली, १३ कुटुंबीयांना केले स्थलांतरित
By अजित मांडके | Published: September 8, 2022 10:33 PM2022-09-08T22:33:04+5:302022-09-08T22:39:21+5:30
अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली.
ठाणे : अतिवृष्टीदरम्यान महात्मा फुले नगर येथील इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली. या घटनेमुळे इमारतीच्या तळाची माती निघून खांब दिसू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ही इमारत रिकामी केली आहे. त्यातील १३ कुटुंबीय इतरत्र, तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत.
ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी वीजेचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसादरम्यान वागळे इस्टेट भागातील महात्मा फुले नगर येथील मीत अपार्टमेंट या इमारतीला लागूच असलेल्या नाल्याची भिंत पडली. या घटनेची माहिती माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी देताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
नाल्याची भिंत पडल्यामुळे इमारतीच्या तळाची माती निघून गेली असून यामुळे इमारतीचे खांब दिसू लागले आहेत. दोन मजली असलेल्या या इमारतीत १३ कुटुंबीय राहत असून त्याचबरोबर ६ गाळे आहेत. २२ वर्षे जुनी असलेली ही इमारत सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून रिकामी करण्यात आली आहे. त्यातील १३ कुटुंबय इतरत्र तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.