रस्ता खचल्याने 25 दुकानांच्या भिंतींना गेले तडे!
By अजित मांडके | Published: September 22, 2022 03:26 PM2022-09-22T15:26:11+5:302022-09-22T15:29:37+5:30
या घटनेत तब्बल २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेले आहेत.
ठाणे : पारसिक डोंगरालगत असलेला रस्ता खचल्याची घटना कळवा वाघोबानगर येथे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत तब्बल २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय त्या दुकानांना धोकापट्टी लावण्यात आली असून या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
कळवा, वाघोबा नगर, कळवा हिंदी हायस्कूल जवळ, रेल्वे फास्ट ट्रॅक जवळ, पारसिक बोगद्या बाजुला, रेल्वेच्या संरक्षण भिंतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी पारसिक डोंगरालगत खोदकाम करण्यात आले होते. त्या डोंगरालगत असलेला रस्ता खचल्याने जवळच असलेल्या २५ दुकानांच्या भिंतीना तडे गेल्याची माहिती माजी नगरसेवक महेश साळवी यांनी दिली.
या माहितीच्या आधारे, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, कार्यालयीन अधीक्षक, कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, रेल्वे प्रशासनाचे संबंधित वरिष्ठ अभियंता व ठेकेदारांना धाव घेत पाहणी केली असता तब्बल २५ दुकानांचे गाळे धोकादायक झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धोकापट्टी लावण्यात आलेली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. तसेच रेल्वे प्रशासनामार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.