ठाण्याच्या चौकातील भिंती बोलू लागल्या कविता; महापालिकेचा अनोखा उपक्रम
By अजित मांडके | Published: November 4, 2023 12:51 PM2023-11-04T12:51:27+5:302023-11-04T12:51:50+5:30
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील रस्त्यावरील भिंती असो या उड्डाणपूल यांची रंगरंगोटी केल्याने शहर विविध रंगांनी नाहून गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एका चौकात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील ओवी, दुसऱ्या चौकात स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी थोडक्यात सांगितलेले काव्यरूपात शिक्षण महत्व तर आणखी एका चौकात मराठी भाषा दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा होता ते कुसुमाग्रज तसेच बहिणाबाई चौधरी,बालकवी, विं दा करंदीकर, मंगेश पाडगावकर या सारख्या कवीच्या कवितांमधील काव्यरचना थेट मनाला भिडणारे किंवा मराठी भाषेशी जवळीक साधताना दिसत आहे. असा हा अनोखा उपक्रम ठाणे महापालिका प्रशासनाने हाती घेत, शहरातील जवळपास विशिष्ट असे १४ चौकात विशेष आकाराचा भिंत उभारून मराठी भाषेप्रती प्रत्येकाच्या मनात बीज रोविण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात भिंती खऱ्या अर्थाने बोलू लागल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील रस्त्यावरील भिंती असो या उड्डाणपूल यांची रंगरंगोटी केल्याने शहर विविध रंगांनी नाहून गेले आहे. वन्य जीवच नाहीतर वृक्षवल्ली असो या सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींचे छायाचित्र आदी रेखाटून निर्जीव भिंतींमध्ये जीव ओतल्याचे दिसून आले. शहर सौंदर्यीकरणातून हे कामे केली जात आहेत. याचदरम्यान महापालिकेने शहरातील महत्वाची असलेले चौक त्यामध्ये तीन हात नाका, माजीवडा, कॅडबरी यासारख्या १४ चौकात विशिष्ट आकारांच्या भिंती उभारणी करून त्यांच्यावर महाराष्ट्रातील संतमंडळी तसेच मराठी भाषेत आपली आगळीवेगळी छाप उमठवणारे कवीमंडळींच्या कवितांमधील ओवी थेट मनाला स्पर्श करील असे अलंकारिक शब्दरचनांबरोबर बोलके चित्रही काढून तो चौक बोलके केले आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील "दुरितांचे तिमिर जावो ।| विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात ॥" हा अभंगच नाही, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चित्रबरोबर वारीला निघाले वारकरीही पाहण्यास मिळत आहेत. तर थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। अशाप्रकारे शिक्षणाचे महत्व सांगितले. ते एका पाटीवर मांडण्यात आले आहे.
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार असे कुसुमाग्रज यांचे काव्य महाराष्ट्राचा नकाशा काढून दाखविण्यात आला आहे. याशिवाय बहिणाबाई चौधरी यांचे मानसा मानसा कधी व्हशील मानूस लोभासाठी झाला मानसाचारे कानूस असे माणसाला भिडणारे शब्द चौकात भिडताना दिसत आहे. कसे प्रेम करावे, हे कवितेतून मंगेश पाडगावकर यांचे "या ओठानी चुंबून घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानांवरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे." काव्य खऱ्या अर्थाने अंर्तभाव दाखवत आहे. तसेच हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. असे बालकवी यांचे काव्याने थेट फुलराणीला ठाण्यात प्रत्येकासाठी उतरवले आहे असाच भास होत आहे.
महापालिकेच्या या उपक्रमाची खऱ्या अर्थाने चर्चा होऊ लागली आहे. जाता येता महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, कवी यांच्या कवितांमधील त्या ओळी मनाला स्पर्श करणारा धकवा नायसा करते तसेच मराठी भाषा किती मधुर आणि गोड आहे हे दाखवून देत आहे.