बदलापूरमध्ये एमआयडीसीची केमिकल सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटली
By पंकज पाटील | Published: May 30, 2024 05:20 PM2024-05-30T17:20:14+5:302024-05-30T17:20:28+5:30
आज सकाळी पुन्हा एकदा ही सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
बदलापूर: बदलापूर शहरातील कारखानदारांचे सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्यामुळे बदलापुरात अनेक वेळा प्रदूषण झाले आहे. सतत फुटणाऱ्या या जलवाहिनीमुळे बदलापूरकर त्रस्त झाले आहेत. आज सकाळी पुन्हा एकदा ही सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
बदलापूर शहरातील कारखानदारांचे सर्व केमिकल युक्त सांडपाणी हे जलवाहिनी मार्गे अंबरनाथच्या दिशेने नेण्यात येत आहे. मात्र या केमिकलच्या जलवाहिनीला अनेक वेळा गळती लागत असल्यामुळे सर्व सांडपाणी रस्त्यावर आणि नाल्यांमधून वाहू लागले आहे. सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी जीर्ण झाल्यामुळे अनेक वेळा त्याला गळती लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र असे असताना देखील ही जलवाहिनी बदलण्याचे काम करण्यात आलेले नाही. बदलापुरात अनेक वेळा सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्यामुळे सर्व रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आले होते. गुरुवारी सकाळी देखील असाच प्रकार घडल्याने सर्व सांडपाणी नाल्यात सोडण्याची वेळ आली होती. हे केमिकलयुक्त सांडपाणी थेट नाल्यात सोडल्यामुळे अनेक भागात दुर्गंधी पसरली होती.