धुराने गुदमरून महिलेचा मृत्यू, तर गुदमरलेल्या चौघेजण पडले बेशुद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:13 PM2022-07-04T19:13:56+5:302022-07-04T19:22:56+5:30
The woman died of suffocation :बेडरूममध्ये असलेल्या एका महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर चौघेजण गुदमरून बेशुद्ध झाल्याची घटना घडली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावातील एका खाजगी बंगल्यात शॉर्टसर्किटमुळे शनिवारी मध्यरात्री आग लागली. बेडरूममध्ये असलेल्या एका महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला तर चौघेजण गुदमरून बेशुद्ध झाल्याची घटना घडली. दरम्यान चौघांची तब्येत ठणठणीत असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा पूर्वेतील 'आई' या बंगल्याला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. यावेळी बेडरूम मध्ये असलेल्या जयश्री भरत म्हात्रे या महिलेचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. तर आगीमुळे त्यांचा मुलगा व इतर तीन जणांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला. त्यात ते होरपळून व श्वास गुदमरल्याने बेशुद्ध झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेते असून त्यांची तब्येत ठणठणीत झाली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.
आगीच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या जयश्री यांचे पती भरत म्हात्रे हे उत्तर भारतात देव दर्शनाला गेल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवीत काही तासात आग आटोक्यात आणली. याबाबत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून आग कशामुळे लागली याचा शोध पोलीस व अग्निशमन दलाचे अधिकारी घेत आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड करीत आहेत.