ग्रीन हा शब्द काळा झाला आहे - मेधा पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 05:24 PM2024-01-04T17:24:51+5:302024-01-04T17:26:20+5:30
मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौर ऊर्जा निर्मिती व जनजागृती केंद्राचे उद्घाटन पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
ठाणे : ग्रीन हा शब्द काळा झाला आहे. सगळीकडे ग्रीन शब्द जोडला जात आहे. जीवन काळे करणाऱ्या वायूंचा निर्माण करणाऱ्याला ग्रीन शब्द कसा काय वापरायचा? या देशातच नव्हे तर दुनियेत नैसर्गिक शक्ती म्हणून मानल्या जाणाऱ्या संसधनेवर कोट्यवधी जनता जगतेय. जगातील हजारो वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, जगातील मनुष्यजाती संपण्याकडे आपण कुठे तरी प्रवास करतोय हे भयंकर चित्र असताना पर्यावरण वाचविण्याचा विचार आपण केला पाहिजे असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.
मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालयात सौर ऊर्जा निर्मिती व जनजागृती केंद्राचे उद्घाटन पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी आर्थिक सहाय्य करणारे शाळेचे माजी विद्यार्थी संजय मं. गो. व माजी विद्यार्थिनी लतिका सु. मो. या दाम्पत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आले. पाटकर पुढे म्हणाल्या की, अधिकची जमीन न घेता शाळेच्या छप्परावर सौरऊर्जा निर्माण केली याबद्दल त्यांनी कौतुक केले. आज अनेक ठिकाणी सोलार पार्क उभे राहत आहेत. एक मेगा व्हॅटसाठी पाच एकर जमीन आक्रमित केली जाते.
अन्न पिकवणाऱ्या जमीनी जायला लागल्या आहेत. ऊर्जेचे स्त्रोत संपवू लागलो तर खरी शक्ती, ऊर्जा माणसामध्ये पण आहे तीचा विसर पडेल. सौरऊर्जा प्रत्येक घराच्या छतावर, शेतात असते ती नाकारणे शक्य नाही. ऊर्जास्त्रोतांवर अधिकार कोणाचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ग्रीन स्कूल सारखा प्रकल्प एका शाळेपुरता मर्यादीत न राहता प्रत्येक घरावर सोलार पॅनल जावे. समतावादी संसाधनाचा वाटप करणे याचे प्रतिक म्हणजे हा प्रकल्प आहे. प्रत्येक क्षेत्रात पर्यायी तंत्रज्ञानाची गरज आहे. पुढची पिढी वाचवण्यासाठी अशा प्रकल्पांचा शिक्षण क्षेत्रात सामील करुन घेणे गरजेचे आहे. वस्त्यांमध्ये किती घरात दिवा नाही याचा आढावा विद्यार्थ्यांतर्फे घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.