ठाणे स्थानकातील फलाट रुंदीचे काम अखेर पूर्ण, प्रवाशांनी घेतला मोकळा श्वास
By अनिकेत घमंडी | Published: June 2, 2024 08:18 PM2024-06-02T20:18:49+5:302024-06-02T20:19:02+5:30
प्रवाशांनी सहकार्य केल्याने मध्य रेल्वेने मानले आभार
डोंबिवली: ठाणे स्थानकात फलाट क्र.५/६ च्या रुंदीकरणाचे आव्हानात्मक काम ठाणे स्थानकावर ५/६ चे काम हाती घेण्यात आले होते. ते काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी मध्य रात्रीपासून ब्लॉक घेण्यात आला होता, तो रविवारी दुपारी पूर्ण झाला आणि फलाट ५ वरून प्रवाशांना घेऊन दुपारी १:३० वाजता कसारा फास्ट लोकल कल्याणच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. सकाळीं १०:३० वाजता घेण्यात आलेली चाचणी याशस्वी झाल्याचे सांगण्यात आले.
ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म ५/६ हे ३०० हून अधिक उपनगरी तसेच मेल/एक्स्प्रेस गाड्या हाताळणाऱ्या सर्वात व्यस्त प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. तेथे ७८५ प्रीकास्ट होलो ब्लॉक्स बसवून ५८७ मीटरच्या संपूर्ण लांबीसाठी ३ मीटरने रुंदीकरण करण्यात आले. हे प्रीकास्ट ब्लॉक्स प्लॅटफॉUर्म पृष्ठभाग सेटलमेंटची शक्यता कमी करतात. प्लॅटफॉर्मच्या बांधकामासाठी अशा प्रकारच्या ब्लॉक्सचा वापर पहिल्यांदाच झाला असून ते काम रविवारी दुपारी दीडच्या सुमारास पूर्ण झाले. त्या कामात २ काँक्रीट पंप, ५ पोकलेन, १ रोलर, १ बॅलास्ट ट्रेन, ३२ टँक वॅगन आणि ४ लोकोमोटिव्हचा वापर करण्यात आला. प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून वन फूट ओव्हर ब्रिजही तोडण्यात आला आणि काही दिवसांपूर्वी नवीन बांधण्यात आला.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांच्या टीममध्ये प्रत्येक संघाचे नेतृत्व करणारे १५ वरिष्ठ विभाग अभियंते आणि १० विविध कंत्राटदारांच्या सुमारे ४०० मजुरांच्या २० संघांनी लक्ष्यित वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अहोरात्र काम केले. ब्लॉक दरम्यान सुरक्षित आणि सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी, ९३० उपनगरीय गाड्या रद्द करण्यात आल्या. याशिवाय काही मेल/एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या तर काही दादर, पनवेल, नाशिक, मनमाड आणि पुणे स्थानकांवरून/येत्या शॉर्ट टर्मिनेटेड/शॉर्ट ओरिजिनेशन उभ्या होत्या.
प्रवाशांना मदत करण्यासाठी विविध स्थानकांवर व्यावसायिक कर्मचारी आणि आरपीएफ आणि स्टेशन कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले होते. रद्द करण्याबाबत सतत घोषणा करण्याबरोबरच, मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन/टर्मिनेशन आणि उपनगरीय गाड्यांबद्दल माहिती देण्यात आल्याचा दावा रेल्वेने।केला.
तीव्र उष्णता आणि विक्रमी तापमान असूनही, पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्रवाशांच्या गरजा आणि सोई यांना प्राधान्य देऊन, अनेक संघांनी हे महत्त्वपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी एकत्रित परिश्रम केल्याचे यावेळी दिसून आले.
मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या पाठिंब्याचे कौतुक करते ज्यांनी मध्य रेल्वेला प्रतिसाद दिला आणि अत्यावश्यक असल्याशिवाय ट्रेनमधून प्रवास टाळल्याने हे शक्य झाल्याने मद्य रेल्वेने प्रवाशांचे जाहीर आभार मानले.