मीरा भाईंदर महापालिकेच्या बंद पडलेल्या ३ कचरा प्रकल्पांची कामे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:18 PM2023-03-23T19:18:17+5:302023-03-23T19:19:21+5:30
ओल्या कचऱ्यावर प्रक्रियासाठी शहरात ६ बायोगॅस प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
मीरारोड - मीरा भाईंदर शहरात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे ६ बायोमिथेनेशन प्रकल्प पैकी पडलेल्या ३ प्रकल्पांची कामे सुरू झाली असून येत्या २ ते ३ महिन्यात पूर्ण होणार आहेत. सदर ३ प्रकल्पातून ५० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाणार आहे.
शहरातील सर्व ओला व सुका कचरा हा उत्तनच्या डम्पिंग वर नेला जातो. तेथे कचरा प्रकल्प असला तरी शहरात लहान लहान कचरा प्रकल्प उभारून त्या त्या भागातल्या कचऱ्याची तेथेच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी चालवला आहे.
ओल्या कचऱ्यावर प्रक्रियासाठी शहरात ६ बायोगॅस प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील नवघर स्मशानभूमी मागे २० व १० टनचे २ प्रकल्प तर कनकिया, भाईंदर पश्चिम येथे प्रत्येकी १० टन चे १ असे एकूण ५० टन चे ४ प्रकल्प पालिकेने सुरु केले आहेत. सदर प्रकल्पातून वीज निर्मिती केली जात असून त्यामुळे प्रकल्प चालवण्यासाठी वेगळ्या विजेची गरज नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
मीरारोडच्या महाजन वाडी येथे २० टन, काशीमीरा पोलीस ठाण्या मागील तन्वी येथे १० टन आणि पेणकरपाडा येथे २० टन ह्या ३ ठिकाणी कचरा प्रकल्पाची कामे निधी अभावी बंद पडलेली होत . त्या बाबतचे वृत्त लोकमतने डिसेंबर २०२२ मध्ये दिले होते. अत्यावश्यक व महत्वाच्या कचरा प्रकल्पची कामे निधी अभावी बंद पडल्याने पालिकेवर टीका झाली.
आता मात्र ह्या तीन प्रकल्पांची कामे पुन्हा सुरु झाली असून येत्या २ ते ३ महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती उपायुक्त रवी पवार यांनी दिली आहे . एकूण १०० टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची ह्या ६ प्रकल्पांची क्षमता असून त्यातून १२०० केव्हीए इतकी वीज तयार होणार आहे . ती वीज अदानी वीज कंपनीला विक्री केली जाणार असून त्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक प्राधिकरण कडे दाद मागितली असल्याचे पवार म्हणाले . ह्या प्रकल्पांसाठी सुमारे ३५ ते ३६ कोटींचा खर्च असून केंद्र व राज्य सरकार ६७ टक्के निधी देणार असून पालिका ३३ टक्के वाटा उचलणार आहे.