आगीच्या धुराचा तरुणाला त्रास, इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान; उपचाराकरिता रुग्णालयात दाखल
By अजित मांडके | Published: January 5, 2024 07:22 PM2024-01-05T19:22:17+5:302024-01-05T19:25:00+5:30
आगीवर अवघ्या अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोपरी पूर्व आनंद नगर येथील झेंडे चाळीमधील एका घरातील इलेक्ट्रिक वायरींगला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास समोर आली. या घटनेत घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपाट व प्लास्टिक साहित्य, तसेच घरातील इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. शिवाय आगीमुळे झालेल्या धुराचा २० वर्षीय रवी दळवी या तरुणाला श्वास घेताना त्रास होत असल्याने उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर आगीवर अवघ्या अर्ध्या तासात नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
कोपरी पूर्व येथील तळ अधिक एक मजली असलेल्या झेंडे चाळीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नं. १४४६ मध्ये आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दल यांनी धाव घेतली. तर आग लागल्याने भाडेकरू अनिकेत दळवी यांच्या घरातील फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, कपाट व प्लास्टिक साहित्य, तसेच घरातील इतर साहित्य जळून नुकसान झाले आहे. तसेच आग लागून घरामध्ये धूर झाल्याने रवी दळवी यांना श्वास घेताना त्रास झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.