भाईंदरच्या रेल्वे पुलावरून खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळ सापडली
By धीरज परब | Published: August 8, 2022 10:57 PM2022-08-08T22:57:00+5:302022-08-08T22:57:37+5:30
Bhayander : भाईंदरच्या रेल्वे पुलावरून सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली.
- धीरज परब
मीरारोड - भाईंदरच्या रेल्वे पुलावरून सायंकाळी खाडीत पडलेली तरुणी तब्बल ७ तासांनी चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरलेल्या बोटी जवळ सापडली . दलदलीच्या ठिकाणी पहाटे २ च्या सुमारास महिलेचा आवाज ऐकून आधी बोटी वरील मच्छिमारांची बोबडीच वळली . परंतु नंतर ती महिला असल्याची खात्री पटल्यावर तिला बोटीत घेऊन नंतर किनाऱ्यावर आणले .
भाईंदर खाडी वरील रेल्वे पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस व रेल्वे सुरक्षा बल कडून कमालीचे दुर्लक्ष केले जात असल्याने पुला वरून खाडीत आत्महत्या करण्याच्या व पुलावर गेले असताना खाली पडण्याच्या घटना वाढत आहेत . काही दिवसां पूर्वीच खाडी पुला वरून खाडीत पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला वाचवण्यात आले होते . तोच रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास पुला वरून रंजना विश्वकर्मा रा . संतोष भुवन , नालासोपारा हि तरुणी पुला वरून खाडीत पडली . त्यावेळी स्थानिक मच्छीमारांच्या सहकार्याने नवघर पोलिसांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती सापडली नाही .
दरम्यान वादळी वारे व मुसळधार पाऊस असल्याने उत्तन - चौक भागातील मच्छीमार बोटी किनाऱ्याला आल्या असून चौक जेट्टी जवळील खाडी किनारी नांगरण्यात आल्या आहेत . हा भाग अतिशय निर्जन व दलदलीचा असून येथे कोणी चालत सुद्धा जाऊ शकत नाही . चौक जेट्टी वर जायचेच झाले तर लहान बोटीनेच ये - जा करावी लागते . हॉली स्काय बोटीचे मालक ऑलिव्हर बांड्या व अन्य मच्छिमार , खलाशी हे बोटीवरचा झोपले असताना रविवारी पहाटे २ च्या सुमारास अचानक एका महिलेचा आवाज येऊ लागला . आवाजाने मच्छीमार उठले व खरंच महिलेचा आवाज येतोय का ? अशी एकमेकास विचारणा करू लागले . आवाज महिलेचा असल्याची खात्री होताच आजूबाजूला लाईट पाहणी केली असता त्यांच्या लहान बोटीतून खरंच हाक मारणारी महिला दिसली . आधी तर सर्वांची भुताटकी वाटून बोबडीच वळली .
पण नंतर धीर धरून त्या महिलेस विचारणा करत तिचे फोटो व छायाचित्रण करून मच्छिमार नेते बर्नड डिमेलो याना पाठवले . त्यांनी उत्तन सागरी पोलिसांना कळवले . मच्छीमारांनी महिलेस चहा दिला व कपडे दिले . भरती आल्यावर लहान बोटीने तिला जेट्टीवर आणून उत्तन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले . पोलिसांनी नंतर त्या महिलेचा प्राथमिक जबाब घेऊन नवघर पोलिसां कडे सोपवले . पोलिसांनी तिला तिच्या परिचितां कडे सुपूर्द केले असून खाडीत पडल्या नंतर ती पाण्याच्या प्रवाहात वाहत नंतर खाडी किनाऱ्याच्या चिखलात अडकली . मच्छिमारांच्या बोटी वरील विजेचे दिवे पाहून ती चिखल तुडवत कशीबशी तिथे पोहचली असे सांगण्यात आले . तिचा भाऊ काही महिन्या पूर्वी खाडी पुलावरून पडून मरण पावल्याने ती मैत्रिणीसह पुलावर आली होती .