तरुण पिढीने राजा रविवर्मा समजून घेतला पाहिजे - ज्येष्ठ चित्रकार नीलिमा कढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 03:19 PM2022-05-02T15:19:57+5:302022-05-02T15:20:06+5:30
ठाण्यातील हजुरी परिसरातील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेने भरवलेल्या राजा रविवर्मा यांच्यावरील चित्रप्रदर्शनात राजा रविवर्मा यांच्या चित्रशैली बद्दल बोलण्यासाठी आज ठाणे स्कूल ऑफ आर्ट्सच्या संचालिका कढे उपस्थित होत्या.
ठाणे : चित्र हे सर्वांनाच परवडणारे माध्यम नसलेल्या काळात जनसामान्यांपर्यंत चित्रकला पोचविण्यासाठी राजा रविवर्मा यांनी मूलगामी प्रयत्न केले. त्यांनी काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती छापण्यासाठी लोणावळ्याजवळील मळवली येथे चित्रांचा कारखाना सुरू केला. पाश्चात्त्य वास्तववादी चित्रकला व भारतीय पुराणांमधील पात्र यांचा सुंदर मिलाफ राजा रविवर्मा यांच्या चित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असे मत ज्येष्ठ चित्रकार नीलिमा कढे यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील हजुरी परिसरातील प्राच्य विद्या अभ्यास संस्थेने भरवलेल्या राजा रविवर्मा यांच्यावरील चित्रप्रदर्शनात राजा रविवर्मा यांच्या चित्रशैली बद्दल बोलण्यासाठी आज ठाणे स्कूल ऑफ आर्ट्सच्या संचालिका कढे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राजा रविवर्मा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या प्राच्य विद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर व प्रदर्शन समन्वयक डॉ महेश बेडेकर यांचे कौतुक केले. याप्रसंगी ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात लावलेल्या चित्रांमधून प्रेरणा घेऊन स्वतः कॅनव्हासवर वेगवेगळी चित्र काढून या प्रदर्शनात रंगत आणली. मोबाईल टेलिव्हिजन व समाज माध्यमांच्या अतिरेकी वापरातून पुढच्या पिढीला सोडवणे हे आव्हान असून कलेच्या माध्यमातून त्यांना भारतीय परंपरांशी जोडण्यासाठी राजा रविवर्मा एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. त्यासाठी तरुण पिढीने राजा रविवर्मा यांची चित्रे समजून घेतली पाहिजेत असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी त्यांची मुलाखत डॉ प्रशांत धर्माधिकारी यांनी घेतली. १९८६ मध्ये स्थापन झालेली ठाणे स्कूल ऑफ आर्ट ही संस्था चित्रकलेतील अनेक अभ्यासक्रम तयार करून फाईन आर्ट्स अप्लाइड आर्ट शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते . या संस्थेत अडीचशे विद्यार्थी शिकतात. ७ मे पर्यंत सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राच्यविद्या अभ्यास संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय बेडेकर यांनी केले आहे.