खारीगावातील ग्रामस्थांचा रंगमंच, हॉलला पालिकेचे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:28 AM2018-09-04T00:28:43+5:302018-09-04T00:28:51+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेने खारीगाव ग्रामस्थांच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या वापरातील रंगमंच तसेच हॉलला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. गावातले आजीमाजी तब्बल नऊ नगरसेवक असूनही सील ठोकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे.

 Theater of village Kharigavas, Hall of the Municipal Corporation seal | खारीगावातील ग्रामस्थांचा रंगमंच, हॉलला पालिकेचे सील

खारीगावातील ग्रामस्थांचा रंगमंच, हॉलला पालिकेचे सील

Next

- धीरज परब

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने खारीगाव ग्रामस्थांच्या सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या वापरातील रंगमंच तसेच हॉलला मोठ्या पोलीस बंदोबस्तात सील ठोकले आहे. गावातले आजीमाजी तब्बल नऊ नगरसेवक असूनही सील ठोकल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. याशिवाय धारावी मंदिर, घोडबंदर, मोर्वा, राई, पेणकरपाडा, नवघर, डोंगरी, मुर्धा, मोर्वा येथील समाजमंदिर, व्यायामशाळा, आखाडा आदी १४ मालमत्तांनासुद्धा सील ठोकण्याची तयारी पालिकेने केली आहे. बाजारभावाप्रमाणे भाडे आकारण्यासाठी पालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे.
भार्इंदर पूर्वेच्या खारीगावात स्थानिक आगरी समाजाचे सत्यनारायण मंदिर आहे. जवळच महापालिकेच्या नगरसेवक निधीतून रंगमंच आणि एक मजली लहान हॉल बांधण्यात आला आहे. रंगमंचाचा वापर गावातील यात्रा वा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होतो. लहान हॉल ग्रामस्थ विविध कार्यक्रमांसाठी उपयोगात आणतात. अनेक वर्षांपासून सत्यनारायण मंदिर ट्रस्टच्या ताब्यात सदर मालमत्ता आहे. शुक्रवारी महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात लहान हॉलला सील ठोकले आहे. रंगमंच मोकळा असला, तरी त्यालादेखील प्रातिनिधिक सील ठोकले आहे. यावेळी माजी नगरसेवक शशिकांत भोईरसुद्धा उपस्थित होते. गावातले विद्यमान चार आणि माजी पाच असे नऊ आजीमाजी नगरसेवक असताना सील ठोकल्याने गावात अस्वस्थता पसरली आहे. ही जागा पालिकेच्या नाही तर ग्रामस्थांच्या मालकीची आहे. पालिकेने नगरसेवक निधीतून बेकायदा बांधकाम केले आहे. याविरोधात कायदेशीर लढा देण्यास आपण समर्थ आहोत, असे माजी सभापती तथा सत्यनारायण मंदिरचे ट्रस्टी मोहन पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेने आपल्या मालमत्ता या रेडीरेकनरच्या दराप्रमाणे भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सदर मालमत्ता भाड्याने देण्यासाठी पालिकेने निविदा काढल्या. पण, अवास्तव भाड्याच्या मागणीमुळे प्रतिसाद मिळाला नाही. ही मालमत्ता कोणत्याही संस्थेकडे दिली नसल्याने पालिकेने कारवाई सुरू केली.
मुळात बहुतांशी मालमत्तांचा वाणिज्य वापरच होत नसून सामाजिक, सांस्कृतिक, कामांसाठी त्याचा वापर केला जातो आहे. आंबेडकरनगर येथे समाजमंदिरात कुस्तीचा आखाडा अनेक वर्षे सुरू आहे. तर, अनेक ठिकाणी व्यायामशाळा चालवल्या जात आहेत. वास्तविक, बहुतांश जागांची मालकी पालिकेची नसतानाही बांधकामे केली आहेत आणि पालिका सदर मालमत्ता आपली असल्याचा दावा करते आहे. ही मालमत्ता स्थानिकांच्या वापरात असून त्यांना हुसकावण्याचा घाट पालिकेने कोणाचा इशाऱ्यावरून घातला आहे, असा ग्रामस्थांचा सवाल आहे.

भाड्यासाठी प्रतिसाद नाही
शासन आदेशानुसार पालिकेच्या मालमत्ता रेडीरेकनरच्या दराने भाड्याने देणे बंधनकारक आहे. पण, भाड्याने घेण्यासाठी प्रतिसाद न मिळाल्याने आदेशानुसार पालिकेने मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी सील ठोकण्याची कार्यवाही सुरू केली आहे, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित म्हणाले.

Web Title:  Theater of village Kharigavas, Hall of the Municipal Corporation seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे