नाट्यगृहे उघडली तरी बालरंगभूमीचा पडदा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 08:30 AM2020-12-20T08:30:59+5:302020-12-20T08:31:28+5:30
Thane : शासनाने अद्याप बालरंगभूमी सुरू करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बालनाट्य संस्थांनी सबुरीची भूमिका घेतली आहे.
ठाणे : नाट्यगृहे ही व्यावसायिक रंगभूमीसाठी खुली झाली असली तरी अद्याप बालरंगभूमीसाठी पडदा हा बंदच आहे. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत बालनाट्ये होणार नाहीत. त्यामुळे सध्या वेट ॲण्ड वॉचची भूमिका असल्याचे बालनाट्य संस्थांनी ‘लोकमत’ला सांगितले. परंतु, बालरंगभूमीसाठी नाट्यगृहे बंद असली तरी नाटके बंद नाहीत. नाटकांची ऑनलाइन शाळा सुरू आहे. काही बालनाट्य संस्थांनी ऑनलाइन अभ्यासक्रमात बदल केला आहे. तर काही संस्था नाट्यप्रशिक्षण न घेता बालकलाकारांचे उपक्रमातून मनोरंजन करीत आहेत.
आठवडाभरापूर्वी नाट्यगृहाचा पडदा उघडला. शासनाने अद्याप बालरंगभूमी सुरू करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बालनाट्य संस्थांनी सबुरीची भूमिका घेतली आहे.
ऑनलाइन शाळा घरात आली त्यानंतर ऑनलाइन बालनाट्यही घरात आणले गेले. जानेवारीत कोरोनाची लस येईल, अशी अपेक्षा असल्याने दोन महिन्यांत शाळा सुरू झाली की एप्रिल-मे महिन्यात बालरंगभूमी सुरू होतील, ही दाट अपेक्षा असून उन्हाळी सुट्टीत बालनाट्ये पाहता येतील, अशी अपेक्षा बालनाट्य संस्थांनी व्यक्त केली. यासाठी काही बालनाट्य संस्थांनी अभ्यासक्रमातही बदल केला. तालमीमध्ये वर्गात रंगमंचावर मुलांना प्रयोग सादर करावे लागत. परंतु, ऑनलाइनमध्ये घरात कॅमेऱ्यासमोर प्रयोग सादर करावे लागतात, म्हणून बालकलाकारांना एकपात्री प्रयोग करण्यास उद्युक्त केले, असे चिल्ड्रेन थिएटर ॲकॅडमीचे संस्थापक राजू तुलालवार यांनी सांगितले.
नाटक ही समूहाची कला असल्याने ती कला ऑनलाइन होणारी नाही, म्हणून गंधारने ऑनलाइन नाट्यप्रशिक्षण न घेता ऑनलाइन विविध उपक्रम हाती घेऊन मनोरंजन केले जात आहे. त्यामुळे बालरंगभूमीचा पडदा उघडण्याची वाट पाहत असल्याचे मत गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांनी सांगितले.
उन्हाळी सुट्टीत बालनाट्य नाही सुरू झाले तर पर्यायी व्यवस्थादेखील आम्ही केली आहे. निवडक कलाकारांना बोलावून चित्रीकरण करून व्हिडीओ पाठविणार अथवा घरात अभिनय करून तो बनवून पाठविणार. हे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे झाले असले तरी बालप्रेक्षकाला बालनाट्य पाहत असल्याचे समाधान मिळेल.
- राजू तुलालवार
सध्याच्या काळात
बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाइन कथाकथन, कविता वाचन, एकपात्री अभिनय स्पर्धा आणि नाट्य छटा अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. बालनाट्य बंद पडणार नाहीत, यासाठी काही संस्था तसेच पालकही प्रयत्नशील आहेत.