‘जिवा महाला’वर रंगमंचीय आविष्कार ठाण्यात

By Admin | Published: May 30, 2017 05:40 AM2017-05-30T05:40:14+5:302017-05-30T05:40:55+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आयुष्यात ज्यांचा ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ असा अभिमानाने उल्लेख होतो, त्या जिवा

Theatrical invention at Jiva Mahala is in Thane | ‘जिवा महाला’वर रंगमंचीय आविष्कार ठाण्यात

‘जिवा महाला’वर रंगमंचीय आविष्कार ठाण्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी आयुष्यात ज्यांचा ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ असा अभिमानाने उल्लेख होतो, त्या जिवा महालाच्या आयुष्यावर प्रसिद्ध लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी कादंबरी रचली आहे. त्याच कादंबरीवर आधारित मंदार टिल्लू नाटक लिहीत असून त्याचा पहिला प्रयोग गडकरी रंगायतनमध्ये होणार असल्याची माहिती टिल्लू यांनी दिली.
रविवारी जिवा महाला यांचे चौदावे वंशज प्रकाश यांची पत्नी जयश्री ठाण्यात होत्या. त्या वेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची जगण्यासाठी होणारी ओढाताण व्यक्त केली होती. ‘आमचे राहते घर बारावे वंशज महादेव यांनी बांधले होते. मुलगा प्रतीकचे शिक्षण पूर्ण व्हावे, ही इच्छा आहे. मुलगी प्रतीक्षा ही दहावी पास झाली आहे. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे तिला पुढचे शिक्षण देणे आमच्यासाठी कठीण आहे. ती अभ्यासात प्रचंड हुशार आहे. शासनाकडून आजवर आम्ही दुर्लक्षित राहिलो आहोत, असे जयश्री यांनी सांगितले.
प्रा. ढवळ म्हणाले, फेब्रुवारी महिन्यात सुरत येथे ‘शिवबा’ हे महानाट्य होते. या वेळी नाभिक समाजाची मंडळी मला भेटली. जिवा महाला हे आमचे दैवत आहे. आपण त्यांच्यावर कादंबरी लिहू शकलात, तर त्यांची ओळख संपूर्ण देशाला होईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिवा महाला यांच्यावर साहित्य वाचायला घेतले. परंतु, चारपाच ओळी सोडल्या, तर त्यांचा कुठेही उल्लेख नाही. त्यांच्याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्या वंशाचा शोध सुरू केला. या वेळी त्यांची चौदावी पिढी ही वाई-अकोली मार्गावरील कोंढवली गावात असल्याची माहिती मिळाली. हे गाव कमळगडाच्या पायथ्याशी आहे. गावकऱ्यांकडून या कुटुंबीयांची माहिती मिळाली. त्यांच्या घरी गेल्यावर समजले की, जिवा महाला यांचे तेरावे वंशज बाळासाहेब यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचे चौदावे वंशज प्रकाश हे गेल्या पाच वर्षांपासून विकलांग आहेत. त्यांचा मुलगा प्रतीक हा आता सातवीत गेला आहे. प्रकाश आणि त्यांची पत्नी जयश्री यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली की, प्रतीकच्या शिक्षणाची सोय झाली, तर बरे होईल. या वेळी त्यांच्या इच्छेचा मान राखत प्रतीकच्या आठवीपासूनच्या शिक्षणाची जबाबदारी आनंद विश्व गुरुकुलने घेतली आहे. त्याची निवासव्यवस्था शहरातच केली जाणार आहे, असे लेखक प्रा. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.
ते म्हणाले की, जिवा महाला यांच्यावर कादंबरी लिहून झाली असून या कादंबरीचे प्रकाशन कोंढवली गावात करण्याचा मानस आहे. २००-२५० पानांची ही कादंबरी आहे. या कादंबरीचे नाव अद्याप ठरलेले नाही, असे ते म्हणाले.

मंदार टिल्लू
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी ज्यांनी मदत केली, त्यातील काही व्यक्तिमत्त्वे शिवबा या नाटकामध्ये आली. प्रत्येक व्यक्तिमत्त्वावर स्वतंत्र नाटक होऊ शकते, असे मनात आले आणि आता योगायोगाने जिवा महाला यांच्यावरील कादंबरीदेखील येत आहे.
या कादंबरीतील अनेक प्रसंग नाट्यस्वरूपात दाखवले, तर ते रसिकांना जास्त कळतील, भिडतील, भावतील. जिवा महाला यांच्यावरील नाटक करताना त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरचा प्रचंड विश्वास हे दाखवण्याची जबाबदारी आहे.
हे नाटक वेगळ्या फॉर्ममध्ये म्हणजेच रेकॉर्डेड असेल. नाटकाचे नाव अद्याप ठरले नसून या नाटकात नवीन स्थानिक कलाकार असतील. दिवाळीपर्यंत हे नाटक रंगमंचावर असेल. नाटकाचा पहिला प्रयोग हा गडकरी रंगायतन येथे होणार आहे. सध्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे, असे या नाटकाचे लेखक मंदार टिल्लू म्हणाले.

Web Title: Theatrical invention at Jiva Mahala is in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.