२५० क्विंटल भाताची चोरी, दीड महिना होऊनही चोरांचा तपास नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 04:00 AM2019-02-18T04:00:04+5:302019-02-18T04:00:21+5:30
२५० क्विंटल भाताची चोरी : शासकीय धान्यचोर अद्याप मोकाट
मुरबाड : आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाताची २१ डिसेंबर रोजी चोरी झाली. चोरट्यांनी ५०० गोण्या लंपास केल्याची प्राथमिक माहिती महामंडळाच्या कर्मचाºयांकडून मिळाली होती. या चोरीचा गुन्हा टोकावडे पोलीस ठाण्यात नोंदवून दीड महिना होत आला, तरीही या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
आदिवासी विकास महामंडळ, उपविभाग शहापूर यांच्या माध्यमातून शेतकºयांकडून हमी भावात भात खरेदी केला जातो. मुरबाड तालुक्यातील माळ आणि धसई येथील खरेदी केंद्रांतून ही भातखरेदी केली जात होती. महामंडळाचे स्वत:चे गोडाउन नसल्याने महामंडळाने आदिवासी सहकारी संस्था माळ आणि दूधनोली या संस्थांना ३५ रु. प्रतिक्विंटल कमिशन या दराने भातखरेदी करण्यास ठरवून दिले होते. या कमिशनमध्ये संस्थेने कर्मचाºयांची मजुरी तसेच देखभाल करावी, असे महामंडळाच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे.
स्वत:चे गोडाउन नसल्याने त्यांनी बंद पडलेल्या पोल्ट्रीच्या इमारती भाड्याने घेऊन तेथे भातखरेदी सुरू केली होती. तर, खापरी येथे बंद पडलेल्या खाजगी शाळेची इमारत भाड्याने घेऊन तेथे भातखरेदी करून ठेवले होते. मात्र, २१ डिसेंबर रोजी खापरी येथील गोडाउनमधून २५० क्विंटलच्या ५०० गोण्या चोरट्यांनी दरवाजा तोडून लंपास केल्या. संस्थेच्या सचिवांनी याची तक्रार टोकावडे पोलीस ठाण्यात २२ डिसेंबर रोजी केली. गुन्हा दाखल होऊन एक महिना होत आला, तरी अद्याप चोरीचा तपास लागलेला नाही.
खापरी येथील आदिवासी विकास खात्याच्या गोडाउनमध्ये झालेल्या भातचोरीचा तपास सुरू असून चोर लवकर पकडले जातील.
- धनंजय पोरे, सहा. पोलीस निरीक्षक, टोकावडे
आदिवासी विकास महामंडळाची खापरी येथील गोडाऊनमधून केलेली भात चोरी ही परिसरातीलच चोरट्यांनी केल्याचा दाट संशय आहे. - रमेश घावट, सचिव,
आदिवासी सेवा सहकारी संस्था, माळ