ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या सायकलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 11:58 PM2020-07-08T23:58:33+5:302020-07-09T00:02:17+5:30
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी पोलिसांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाहन चोरीच्या घटना एरव्ही रोजच ठाण्यात दाखल होत असतात. मंगळवारी कोपरी पोलीस ठाण्यात एका व्हीआयपीची दस्तुरखुद्द पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याच सायकलीची चोरी झाल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल संदीप वाघ यांनी दाखल केली आहे. अर्थात, ही चोरी नसून ती ज्याला वापरायला दिली, त्याने ती परत केली नाही. तो लवकरच परत करणार असल्याचा दावा कोपरी पोलिसांनी केला आहे.
यासंदर्भात कोपरी पोलीस ठाण्यात उपायुक्त काळे यांचे गार्ड वाघ यांनी ७ जुलै रोजी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त काळे यांचे कोपरी येथील १२ बंगलामधील अक्षय या बंगला क्रमांक १६ येथे उभी केलेली हिरव्या रंगाची ३० हजारांची एका नामांकित कंपनीची सायकल ५ जुलै रोजी रात्री ९ ते ६ जुलै रोजी सकाळी १० या दरम्यान चोरीस गेली. या काळात काळे यांच्या बंगल्यावर पोलीस शिपाई (क्र. ६६३३) हे डयूटीवर होते. चोरटयाने तक्रारदार तसेच काळे यांच्या संमतीशिवाय त्यांची ही सायकल चोरुन नेली आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आर. जी. आंब्रे हे अधिक तपास करीत आहेत.
‘‘ होय हे खरे आहे. पण घरात काम करणाऱ्या एका नोकराच्या नातेवाईकाने ती नेली आहे. दोन दिवस वाट पाहूनही तो न आल्याने याबाबत तक्रार दाखल केली. तसा यात बातमीचा विषय नाही.’’
अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक शाखा.