उल्हासनगरात विजयालक्ष्मी ज्वलर्स मध्ये चोरी, ३ कोटी पेक्षा जास्त सोन्याची चोरी, पोलिसांचा संशय
By सदानंद नाईक | Published: June 28, 2023 11:11 PM2023-06-28T23:11:59+5:302023-06-28T23:12:15+5:30
उल्हासनगर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली असून अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही.
उल्हासनगर : कॅम्प नं-२ शिरू चौकातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात मंगळवारी रात्री चोरट्यांनी प्रवेश करून गॅस कटरने लोखंडी तिजोरी फोडून ३ कोटीं पेक्षा जास्त किंमतीच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर पोलिसांनी याबाबत चौकशी सुरू केली असून अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. उल्हासनगर कॅम्प नं-२, प्रसिद्ध सोनार गल्ली शेजारील शिरू चौक परीसरात विजयालक्ष्मी ज्वलर्स नावाचे सोन्याचे दुकान आहे. बुधवारी दुकान उघडले असता दुकानात चोरी झाल्याचे उघड झाले. चोरी बाबत उल्हासनगर पोलिसांना माहिती मिळाल्यावर, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन विविध बाजूने तपास सुरू केला.
चोरट्यांनी ज्वलर्सच्या मागच्या बाजूने प्रवेश करून दुकानातील सोन्याचे दागिने तसेच लोखंडी तिजोरी गॅस कटरने तोडून त्यातील तब्बल ६ किलो वजनाचे व अंदाजे ३ कोटी पेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरून नेले. असा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून त्यानंतरच किती किंमतीचे सोने चोरीला गेले हे उघड होणार आहे. ज्वलर्स दुकानावर वॉचमन गायब असल्याने, त्यानेच साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर पोलीस ठाण्याचें वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक पुलपगारे यांना संपर्क केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. मात्र अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी चोरी झाल्याची कबुली दिली असून पोलिसांनी विविध पथकाद्वारे तपास सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. शहरात मटका जुगार, गावठी दारू, ऑनलाईन जुगार आदी अवैध धंद्यात वाढ झाल्याचा आरोप राजकीय नेत्यांकडून होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची टीकाही नागरिकांकडून होत आहे.