ठाण्यातील पेट्रोल पंप मालकाच्या कारमधून रोकडसह रिव्हॉल्व्हरची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 06:52 PM2019-01-10T18:52:25+5:302019-01-10T18:58:05+5:30
पेट्रोल पंपाचा मालक बँकेत काही कामासाठी गेल्यानंतर त्याच्या कारमधून गावठी रिव्हॉल्व्हरसह ७० हजारांचा ऐवज असलेली बॅग चोरीस गेल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. पोलिसांनी नाकाबंदी करुनही चोरटे पसार झाले आहेत.
ठाणे: माजीवडा येथील पेट्रोल पंपाचे मालक कुणाल कजारीया (३८) यांच्या कारमधून गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, पाच जिवंत काडतुसे आणि २० हजारांची रोकड अशा ७० हजारांच्या ऐवजाची चोरी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वा. च्या सुमारास घडली. याप्रकरणी त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
कॅसलमिल येथील विकास कॉम्पलेक्समध्ये राहणारे कजारीया हे ९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी भागातील हायस्ट्रीट मॉल येथे गेले होते. त्यावेळी कार चालक जवळच असल्याने कारला लॉक न करताच रस्त्याच्या कडेला कार उभी करुन ते एचडीएफसी बँकेत काही कामानिमित्त गेले. पंधरा मिनिटांच्या अंतराने ते कारजवळ परतले. पण, तोपर्यंत त्यांच्या कारमधील मागच्या सीटवरील २० हजारांची रोकड, ५० हजारांचे एक गावठी पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे असलेली बॅग चोरटयांनी लंपास केली. कजारीया यांच्या मागोमाग त्यांचा चालकही पाणी पिण्यासाठी गेला होता. हीच संधी साधून चोरटयांनी ही बॅग लंपास केली. त्यांनी सुरक्षेसाठी परवाना असलेले गावठी पिस्तुल खरेदी केले होते. ते चोरीस गेल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढल्याचे बोलले जात आहे. त्याचा कोणीही गैरवापर करण्याची भीती असल्याने पोलिसांनी बुधवारी तातडीने नाकाबंदीही केली होती. परंतू, हे चोरटे आढळले नाही. सीसीटीव्ही तसेच इतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या चोरीचा तपास करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.