सागर ज्वेलर्समधील चोरी: मोबाइलच्या आधारे ज्वेलर चोरीचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 02:39 AM2017-10-11T02:39:37+5:302017-10-11T02:40:09+5:30
सागर ज्वेलर्समधील चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पथक तयार करून चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दोन मोबाइलही चोरल्याने त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचा प्रयत्न आहे.
अंबरनाथ : सागर ज्वेलर्समधील चोरी प्रकरणात पोलिसांनी तपास पथक तयार करून चोरट्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. चोरट्यांनी दुकानात ठेवलेले दोन मोबाइलही चोरल्याने त्याआधारे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांचा प्रयत्न आहे. मोबाइल सुरु केल्यास ट्रेस करण्याचे प्रयत्न पोलीस करत आहे. पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी चोरट्यांचे फोटो प्रसिध्द केले आहेत.
अंबरनाथच्या सागर ज्वेलर्स दुकानातून ८.५ किलो सोने चोरट्यांनी भर दिवसा लंपास केले. दुकान तासभरासाठी बंद ठेवलेले असताना त्याची संधी साधत चोरट्यांनी मागील दार तोडून दुकानात प्रवेश केला. त्यातील सर्व सोने त्यांनी लंपास केले. त्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू असून स्थानिक पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग या प्रकरणात तपास करत आहेत. या तपासातील मुख्य धागा म्हणजे चोरलेले मोबाइल. या दोन मोबाइलपैकी एक मोबाइल आधुनिक आहे. त्यामुळे तो मोबाइल काही क्षणांसाठी सुरु केल्यास चोरटे कुठे लपून बसले आहेत ते शोधण्यास मदत मिळणार आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. चोरट्यांचे छायाचित्र प्रसिध्द करून चोरट्यांना पकडण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे. या छायाचित्रात चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत असल्याने त्याला पकडण्यासाठी या फोटोची मदत होणार आहे.