त्यांचे लक्ष केवळ स्वत:ची तिजोरी भरण्याकडेच; विजय वडेट्टीवारांचा आरोप, कळवा रुग्णालयाला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 06:33 AM2023-08-18T06:33:23+5:302023-08-18T06:33:30+5:30
ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्यात सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर असलेले ४० आणि आता जे गेले आहेत ते ४० आमदार हे सर्व आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत. ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे. मात्र, ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्या नशिबी पश्चात्तापाची वेळ आल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
कळवा रुग्णालयात झालेल्या १८ मृत्यू प्रकरणाच्या घटनेनंतर गुरुवारी वडेट्टीवार यांनी कळवा रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपने घराणेशाहीविरुद्ध घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना छेडले असता, जेव्हा सगळे पर्याय संपतात त्यावेळेस भाजपला गांधी परिवार दिसतो. गांधी परिवाराकडे बोट दाखवले जाते, दहा वर्षांत उपलब्धी दाखवली असती, जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादीसारख्या पुरोगामी पक्षाची गरजच भाजपला वाटली नसती, असा आरोप त्यांनी केला.
तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी, हिंदुत्वाचे मसिहा समजता, विदेशात जाऊन गोडवे गाता. मात्र, देशातील जनतेला तुम्ही काहीच दिले नसल्याचेही ते म्हणाले. दहा वर्षे सत्तेत असताना आता भाजपला परिवार म्हणण्याचा अधिकार कुठे उरतो, केवळ त्यांना गांधी या नावाची भीती असल्यानेच आता घराणेशाही किंबहुना परिवारवाद हा एकच पर्याय पुढे केला जात असल्याचेही ते म्हणाले.
२०२४ मध्ये ते जनतेच्या भरवशावर नाही तर ईव्हीएमच्या भरवशावर झेंडा फडकवणार असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच आलबेल सुरू आहे. एकाने घोडा लाथ मारतो म्हणून गाढवापुढे उभे राहावे, तर दुसऱ्याने गाढव लाथ मारतो म्हणून घोड्याला दोष देत बसावे, अशीच परिस्थिती राज्यातील सरकारची असल्याचे ते म्हणाले.