चाचणी न करताच ‘त्यांची’ घुसखोरी, ठाण्यात मनसेचे स्टिंग ऑपरेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:20 AM2020-11-26T01:20:27+5:302020-11-26T01:20:38+5:30
ठाण्यात मनसेचे स्टिंग ऑपरेशन
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकावर रात्री ट्रेनने येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना रिक्षावाले जादा पैसे आकारून ॲण्टीजेन टेस्ट न करताच त्यांना इच्छितस्थळी नेत असल्याच्या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश मंगळवारी मध्यरात्री केला. भाजपच्या स्थानिक नगरसेवकानेही यास दुजोरा दिला असून, महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
परप्रांतांतून येणाऱ्या नागरिकांनी ठाणे शहरात येताना ॲण्टीजेन टेस्ट करण्याचे आवाहन ठाणे महापाकिकेने केले. त्यानुसार, चाचणीसाठी हे परप्रांतीय रांगेत उभे राहिले की, रिक्षाचालक त्यांना रांगेतून बाहेर काढून त्यांच्या रिक्षाने इच्छितस्थळी पोहोचवतात. त्यासाठी त्यांच्याकडून रिक्षाच्या भाड्याव्यतिरिक्त २०० ते ५०० रुपये वसूल केले जातात. या गैरकृत्याचा पर्दाफाश मनसेचे कोपरी-पाचपाखाडी विभागाध्यक्ष महेश कदम यांनी मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास घटनास्थळी जाऊन केला. या गंभीर प्रकाराचा पर्दाफाश करण्यासाठी कदम यांनी स्वतः स्टिंग ऑपरेशन केले. त्यासाठी त्यांनी स्वत:चे नाव बदलून सुनील पांड्ये या नावाने फॉर्म भरला. यावेळी प्रवाशांची चाचणी न करतात रिक्षाचालक त्यांना कसे पळवतात, याचे चित्रीकरणच कदम यांनी केले. यावेळी साधे ओळखपत्रही संबंधित कर्मचारी विचारत नसल्याचा आरोप कदम यांनी केला. गेल्या १० दिवसांपासून अशा प्रकारच्या तक्रारी येत होत्या, असे त्यांनी सांगितले. भाजपचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनीही दीड महिन्यापूर्वी हा प्रकार लक्षात येताच रिक्षाचालकांना जाब विचारला होता. यासंदर्भात त्यांनी महापालिका आणि वाहतूक शाखेला तक्रारीही दिल्या होत्या. वाहतूक पोलिसांच्या कार्यालयासमोर रिक्षाचालक उभे राहतात, मात्र प्रवाशांना पळवण्यासाठी सॅटिसवर जातात. वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रिक्षाचालकांची दादागिरी वाढल्याचा आरोप वाघुले यांनी केला.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून शहरात येणाऱ्या प्रवाशांनी ॲण्टीजेन टेस्ट करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. रिक्षाचालक तेथे काय करतात, हे पाहण्याचे काम पालिकेचे नाही.
- संदीप माळवी,
उपायुक्त, ठाणे महापालिका
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून बाहेरून शहरात येणाऱ्या प्रवाशांनी ॲण्टीजेन टेस्ट करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. रिक्षाचालक तेथे काय करतात, हे पाहण्याचे काम पालिकेचे नाही.
- संदीप माळवी,
उपायुक्त, ठाणे महापालिका