बहिणीच्या घरी त्यांचे भोजन शेवटचे ठरले... , शहा कुटुंबीयांवर काळाचा घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 06:32 AM2017-08-28T06:32:30+5:302017-08-28T06:32:39+5:30
डोंबिवलीमधील भाविक देवदर्शनासाठी जीपमधून जात असताना गुजरातमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे.
मुरलीधर भवार
डोंबिवली : डोंबिवलीमधील भाविक देवदर्शनासाठी जीपमधून जात असताना गुजरातमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवली परिसरात शोककळा पसरली आहे. ते सर्वजण कुलदैवताचे दर्शन घेण्यासाठी गुजरातमधील पलिताना येथे गेले होते. डोंबिवलीतून ते शनिवारी सकाळीच निघाले. एक्स्प्रेसने त्यांनी गुजरात गाठले. बहिणीच्या घरी रात्रीचे भोजन घेऊन थोडा वेळ आराम केला आणि पहाटे गाडीने पलिताना येथे जात असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. एकाच कुटुंबातील दहा जण आणि गाडीचा चालक अशा ११ जणांची प्राणज्योत मालवली. पर्युषण पर्व सांगतेला जैन धर्मीय एकाच कुटुंबातील एवढ्या जणांवर मृत्यूने घाला घातल्याचे कळताच डोंबिवलीत शोककळा पसरली.
शहा कुटुंबीय मनमिळाऊ!
निशिगंधा इमारतीत दुसºया मजल्यावर किरण शहा राहत. त्यांच्या शेजारीच नातेवाईकही राहत होते. सारे भाऊ परस्परांना सांभाळून होते. काळजी घेणारे होते. याच इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणारे मनोज मेहता हे शहा कुटुंबीयांचे २५ वर्षांपासूनचे शेजारी. त्यांच्या रूपाने अत्यंत मनमिळाऊ शेजारी आम्हाला लाभले. त्यांच्या कुुटुंबावर अनेक संकटे व दु:खे आली. काळाने अखेर त्यांच्यावरही घाला घातला. सर्व शेजाºयांना हसतमुखाने भेटत त्यांनी शनिवारी निरोप घेतला, तो शेवटचाच, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अशोक संघवी यांच्या घरातच एक जैन मंदिर आहे. शेजारीपाजारी जेव्हा कुठेही बाहेरगावी व चांगल्या कामासाठी निघतात, तेव्हा तेथे नमस्कार करतात. शहा कुटुंबीयांनीही संघवी यांच्या घरातील मंदिरात माथा टेकवून प्रार्थना केली. नंतर ते प्रवासाला गेले, पण पुन्हा आलेच नाहीत... असे सांगताना संघवी व मेहता कुटुंबीय हेलावून गेले.
शशिकांत शहा हे टेलरिंगला लागणारे साहित्य पुरवत. वर्षभरापूर्वी त्यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांची मुलगी धरा काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. तिच्या लग्नाची तयारी सुरू होती. त्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने झडप घातली. शशिकांत, पत्नी रिटा, मुलगी धरा यांचा दुर्घटनेत मृत्यू झाला; तर मुलगा जैनम बचावला. तो डोंबिवलीतील गुरुकूल कॉलेजमध्ये १२ वीत होता.
शहा कुटुंंबातील १० जणांचा मृत्यू झाल्याचे कळताच रविवारी पर्युषणानिमित्तच्या कार्यक्रमांवर दु:खाची छाया पडली. यानिमित्त डोंबिवलीच्या विविध मंदिरांत भोजन व मिष्ठान्न दिले जाते. तेथे केवळ डाळ-भात देण्याचा निर्णय घेण्यात आला. मिष्ठान्न वाटपाचा कार्यक्रम रद्द करून ते गरिबांना वाटण्याचा निर्णय मंदिर व्यवस्थापन समितीने घेतला.
अख्खे कुटुंब काळाच्या पडद्याआड
कमलेश हे व्यापारी होते. त्यांचा सात वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
त्यांची पत्नी किरण ही गृहिणी असली, तरी कमलेश यांच्या मृत्युपश्चात मुलांचा सांभाळ करीत होती.
मुलगी जिनाली ही ठाकुर्लीच्या कॉलेजमध्ये टीवाय बीकॉमला शिक्षण घेत होती; तर नेमिल हा अंधेरीच्या जैन महाविद्यालयात १२ वी सायन्सला शिकत होता. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे अख्खे कुटुंबच काळाने
ओढून नेले.