...तर ‘ऑनर किलिंग’ घडले नसते- असिलता सावरकर-राजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:58 AM2019-06-17T00:58:29+5:302019-06-17T00:58:49+5:30
‘सावरकर घराण्यातील स्त्रीयांचे योगदान’ परिसंवाद
कल्याण : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अनेक पैलू होते. त्यांचा पिंड समाजसुधारकाचा होता. अस्पृश्यता निर्मूलनाचे त्यांचे कार्य रत्नागिरीपुरतेच मर्यादित राहिले. त्यांनी उभारलेल्या पतितपावन या मंदिरात अस्पृश्यांना गाभाऱ्यात जाऊ न दर्शन घेता येऊ लागले. जाती-जातींमध्ये सरमिसळ झाल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट होणार नाही, हे त्यांचे विचार देशभरात पोहचले असते, तर आॅनर किलिंगसारखे प्रकार घडले नसते, असे मत सावरकर यांच्या नात असिलता सावरकर-राजे यांनी रविवारी व्यक्त केले. स्वातंत्र्यापासून ७० वर्षांत सावरकर यांना नाकारण्यापासून स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्याविषयी शाळांमधून खरा इतिहास शिकवला गेल्यास अनेक गैरसमज दूर होतील, असेही त्या म्हणाल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबईच्या वतीने येथील के. सी. गांधी शाळेत ३१वे अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलन रविवारी झाले. या संमेलनात ‘सावरकर घराण्यातील स्त्रियांचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात असिलता यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत सावरकर यांच्या स्नुषा सुंदरबाई सावरकरही सहभागी झाल्या होत्या. या परिसंवादात असिलता बोलत होत्या.
असिलता म्हणाल्या की, ७० वर्षात एकाही पंतप्रधानाने सावरकरांच्या अंदमान निकोबार येथील सेल्युलर जेलला भेट दिली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जेलला भेट दिली. सावरकरांना ज्या कोठडी ठेवले होते, तेथे पंधरा मिनिटे ते बसले होते.
सावरकरांच्या निधनानंतर माझा जन्म झाला. त्यामुळे त्यांना मी पाहिले नाही. शाळेत गेले, तेव्हा मला माहीतही नव्हते की, मी सावरकरांची नात आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मी सावरकरांची नात आहे, हे माहीत होते. शाळेत त्यांची कविता, धडा व प्रसंग शिकताना ऊ र भरून यायचा. आजोबांची कविता व समाजसुधारक हे दोन पैलू मला आवडले. त्यांचा हा सुधारकी बाणा आम्ही चालवत आहोत. मीही परजातीत विवाह केला आहे. आमच्याकडे घरकाम करणारे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य होते, असे त्या म्हणाल्या. माझी मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. त्यांना मराठी समजायला जड जाते. त्यामुळे ते इंग्रजी पुस्तके वाचून सावरकर समजून घेतात, असेही असिलता यांनी सांगितले.
सुंदरबाई म्हणाल्या की, गांधी हत्येच्या वेळीच माझे लग्न झाले. त्यावेळी देशात वातावरण दूषित होते. त्यामुळे आम्हा महिलांना घराबाहेर जाण्याची परवानगी नसायची. गांधी हत्येनंतर सावरकरांना दिल्ली येथे एक वर्ष कैद झाली होती. तेव्हा त्यांनी माझ्या घरच्यांना त्रास होता कामा नये, असे सरकारला बजावले होते. चार महिने घरावर पोलिसांचा पहारा होता. निवडणुकीत आचार्य अत्रे सावरकरांना भेटायला आले होते, तेव्हा सावरकरांनी त्यांचा सत्कार केला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली. सावकर गेले तेव्हा काँग्रेसचा एकही नेता त्यांच्या घरी आला नाही. मात्र लता मंगेशकर, व्ही. शांताराम, अभिनेत्री संध्या, संगीतकार सुधीर फडके अशी दिग्गज मंडळी आली होती, असेही त्या म्हणाल्या. आपल्या निधनानंतर शाळा व कार्यालये बंद न ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली होती. सावरकरांच्या पत्नी माई गेल्या तेव्हा त्यांची भेट झाली नव्हती. माई सावरकर यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यांचे पार्थिव घरी आणू नका. कारण, नात विद्युल्लता ही लहान असल्याने तिला ते पाहावणार नाही हा उद्देश त्यामागे होता, असे सुंदरबाई यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत सावरकरांनी देशाच्या सुरक्षेला महत्त्व दिले असते
सावकरांचे भगूर येथील घर हे सावरकर स्मारकाला दत्तक म्हणून द्यावे. त्यांचा राष्ट्रीय स्मारकात समावेश व्हावा यासाठी सावरकर स्मारकाकडून पाठपुरावा सुरू होता.
सरकारने यासंदर्भातील अध्यादेश नुकताच काढला असल्याची माहिती असिलता सावरकर-राजे यांनी येथे दिली. सावरकरांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हा त्यावेळी विचार मांडला होता.
तो कालसापेक्ष होता. आज ते हयात असते तर त्यांनी विचाराच्या क्रांतीसह देशाच्या सुरक्षिततेला महत्त्व द्या, असे सांगितले असते.