... तर हॉस्पिटल होणार सील, ठाणे महापालिकेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:44 AM2021-01-13T02:44:32+5:302021-01-13T02:44:59+5:30
फायर ऑडिटसाठी महिन्याची मुदत : ठाणे महापालिकेचा इशारा
अजित मांडके
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण देश हादरला आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी ठाणे महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. यानुसार मंगळवारपासून शहरातील ३४७ खासगी आणि २७ शासकीय रुग्णालयांची झाडाझडती सुरू झाली आहे. या रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणा सक्षम आहे का? फायर ऑडिट केले आहे का? याची पाहणी केली जाणार आहे. ते केले नसल्यास पुढील ३० दिवसांत ते करून त्याचा अहवाल सादर करावा, असेही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बजावले आहे. तसे न केल्यास हॉस्पिटलच सील करण्यास त्यांनी अग्निशमन विभागास सांगितले आहे.
भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर सोमवारी आयुक्तांनी अग्निशमन विभागाची बैठक घेऊन हे आदेश दिले आहेत. त्यानुसार अग्निशमन विभागाने प्रत्येक अग्निशमन केंद्रांतर्गत चार ते पाच टीम तयार केल्या आहेत. वागळे, बाळकुम, मुंब्रा, जवाहरबाग, पाचपाखाडी, कोपरी अशा अग्निशमन केंद्रांच्या माध्यमातून ही पाहणी केली जाणार आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी, अधिकारी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. या पाहणीत त्या ठिकाणची अग्निरोधक यंत्रणा सक्षम आहे का?, फायर फायटिंग सिस्टीम, फायर एक्सटेन्शन, वाळूच्या बादल्या, स्मोक डिक्टेटर, स्प्रिंल्कर सिस्टीम, एक्झॉस्ट फॅन या कार्यान्वित आहेत किंवा नाहीत, याची पाहणी केली जाणार आहे.
कळवा, जिल्हा रुग्णालयाचीही होणार झाडाझडती
ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत खासगी रुग्णालयांसोबतच शहरातील महापालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यासह जी काही छोटी, मोठी अशी २७ रुग्णालये आहेत, त्यांचीही झाडाझडती केली जाणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली. त्यामुळे महापालिकेची छोटी रुग्णालये किती सक्षम आहेत, याचीही माहिती पुढे येणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिलेल्या निर्देशानुसार शहरात मंगळवारपासून ही पाहणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधित रुग्णालयांनी पुढील ३० दिवसांत अहवाल सादर करावा; अन्यथा ती सील केली जाणार आहेत.
- गिरीश झळके,
मुख्य अग्निशमन
अधिकारी, ठामपा