..तर आम्हालाही आत्महत्या करण्याची वेळ येईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:37 AM2021-04-12T04:37:41+5:302021-04-12T04:37:41+5:30
प्रशांत माने लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत ...
प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत व्यापारी आणि त्यावर अवलंबून असलेला नोकरदार वर्ग आधीच हवालदिल झाला आहे. त्यामुळे दुसऱ्या लॉकडाऊनचे उभे राहिलेले संकट पाहता त्यांच्यापुढची चिंता अधिकच वाढली आहे. व्यापारी कमावतील तेव्हाच ते आम्हाला वेतन देऊ शकतील ना. त्यांचाच व्यवसाय बंद राहिला तर ते आम्हाला कसे वेतन देऊ शकतील. आधीच व्यापाऱ्यांचे नुकसान झाले असताना दुसरा लॉकडाऊन लागला तर वेतनाअभावी उपासमारीला सामोरे जावे लागेल. परिणामी, शेतकऱ्यांप्रमाणे आम्हालाही आत्महत्या करावी लागेल, अशी भीती नोकरदार वर्ग व्यक्त करत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोणतीही आगाऊ पूर्वसूचना न देता लॉकडाऊन जाहीर झाल्याने परराज्यात राहणाऱ्या नोकरदारांचे स्थानिक पातळीवर माेठे हाल झाले. लॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतूकही बंद झाल्याने पायपीट करत मजुरांना गावे गाठावी लागली. २२ मार्च ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चाललेला लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. ज्यांची दुकाने भाड्याने चालत होती त्यांचे भाडे थकले. हप्ते वाढल्याने व्यवसाय बंद करावे लागले. तर दुसरीकडे ज्यांच्या मालकीची दुकाने होती, त्यांना मालमत्ता कर आणि विजेची बिले भरताना नाकीनव आले. लॉकडाऊननंतरच्या अनलॉकमध्येही चालू झालेल्या व्यवसायांना नियमांचे बंधन कायम राहिल्याने सणासुदीत व्यवसायांवर परिणाम झाला. वर्षभर ही कसरत चालू असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिवसागणिक रुग्णांचे वाढते प्रमाण देशासाठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. त्यामुळे आठ ते पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे वीकेंड लॉकडाऊन लागू केला असताना आठवडाभर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवलीतील काही व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात घरातच उपोषणाचा मार्ग अवलंबून निषेध नोंदवला आहे. या एकूणच परिस्थितीमुळे व्यापारी हतबल झाले आहेत, तर नोकरदार लॉकडाऊनच्या भीतीने गावाकडे निघू लागला आहे.
नाेकरदार पुन्हा देशाेधडीला
काही व्यापाऱ्यांनी नोकरदारांना वाऱ्यावर साेडलेले नाही. व्यवसाय बंद असला तरी त्यांना वेतन देण्यात येत आहे, तर काही ठिकाणी भाडे परवडत नसल्याने व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे येथील नोकरदार देशोधडीला लागल्याचे चित्र आहे. वर्षभर तारेवरची कसरत सुरू असताना एकामागोमाग येत असलेल्या कोरोनाच्या लाटांमध्ये जीवन जगायचे तरी कसे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. राज्य सरकारनेच यामध्ये तोडगा काढून दिलासा द्यावा, याकडे लक्ष वेधले जात आहे.