...तर नेवाळीची पुनरावृत्ती घडेल, संतोष केणे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:20 AM2019-01-22T01:20:42+5:302019-01-22T01:20:48+5:30

आयरेगाव परिसरातील जमीनमालक आणि रहिवासी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून काही व्यक्ती शांतता आणि कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.

... then Nevali will be repeated, a sign of Santosh Kane | ...तर नेवाळीची पुनरावृत्ती घडेल, संतोष केणे यांचा इशारा

...तर नेवाळीची पुनरावृत्ती घडेल, संतोष केणे यांचा इशारा

Next

डोंबिवली : आयरेगाव परिसरातील जमीनमालक आणि रहिवासी यांच्यामध्ये द्वेष निर्माण करून काही व्यक्ती शांतता आणि कायदा-सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीसही त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी भूमिपुत्रांना त्रास देत आहे. आगरी समाजाने संयम सुटल्यास नेवाळीची पुनरावृत्ती घडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी नगरसेवक तथा आयरेगाव भूमिपुत्र जनहित संस्थेचे सल्लागार संतोष केणे यांनी दिला.
डोंबिवलीतील आगरी समाज सभागृहात रविवारी आगरी-कोळी भूमिपुत्रांसह घरमालक व रहिवाशांची विशेष सभा झाली. यावेळी केणे बोलत होते. मंचावर विलास म्हात्रे, गिरीश साळगावकर, गजानन पाटील, मोतीराम गोंधळी, विकास देसले, काळू कोमास्कर, गोविंद भगत, गणेश म्हात्रे, अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेविका सुशीला केणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आयरेगाव येथील इमारतींमधील रहिवाशांकडून पैसे उकळणे आणि इमारतमालकांना मानसिक त्रास देऊन रहिवासी आणि मालक यांच्यात वाद निर्माण करण्याचे कारस्थान काही मंडळी करत असल्याचा आरोप भूमिपुत्र जनहित संस्थेने केला आहे. त्रास देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे.
केणे पुढे म्हणाले की, मालक आणि रहिवासी ४० वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण, काही विघ्नसंतोषी मालक आणि रहिवाशांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजकंटकांकडून मतांचे राजकारण सुरू आहे. धोकादायक इमारती, चाळींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर व म्हाडाच्या धर्तीवर गृहनिर्माण योजनेसारख्या अनेक वादग्रस्त मागण्या करून येथील आगरी-कोळी स्थानिक भूमिपुत्रांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव रचला जात आहे. पोलिसांकडे याबाबत निवेदन देऊनही ते शांत आहेत, उलट भूमिपुत्रांना नोटिसा दिल्या जात आहेत, हे चुकीचे आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अशा शब्दांत केणे यांनी आपले मत व्यक्त केले.
लोकभावना भडकावणे, त्यांची मने कलुषित करणे आणि जेणेकरून आपापसात भांडणे होतील, यासाठी हे सर्व सुरू आहे. इथले रहिवासी आणि मालक यांच्यात कुठलाही वाद नाही. भविष्यातही आम्ही एकत्रच राहणार, विकास दोघांचाही होणार, याची आम्ही ग्वाही देतो, असे अ‍ॅड. भारद्वाज चौधरी यांनी सांगितले. रहिवासी व मालक या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही जण राजकीय षड्यंत्र रचले गेले, तरी ते यशस्वी होणार नाही, असे गणेश म्हात्रे म्हणाले. तर, मालकाची भूमिका ही सामोपचाराची राहिलेली असून भाडेकरूंचे हक्क अबाधित ठेवून आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत काळू कोमास्कर यांनी मांडले.
>शाश्वत विकास हवा
क्लस्टर म्हणजे समूह विकास, पण क्लस्टर या चांगल्या शब्दाचा वापर करून वाईट व्यवस्था राबवली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. समूह विकास हा माणसांनी माणसांसाठी केलेला विकास असतो. त्यात माणसांना योगदान देता आले नाही, तर त्याचा फायदा नाही. भूमिपुत्र सुशिक्षित आहे. त्याला शाश्वत विकास कळतो, त्यामुळे आपल्याबरोबर राहणाºया भाडेकरूला माणूस हा दर्जा देऊन त्याचा विकास कसा करता येईल, याचा तो विचार करतो, असे गिरीश साळगावकर म्हणाले.

Web Title: ... then Nevali will be repeated, a sign of Santosh Kane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.