..तरच जिल्ह्यातील रुग्णांना रक्तसाठ्याचा उपयोग होईल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:58 AM2021-04-05T00:58:21+5:302021-04-05T00:58:36+5:30
जिल्ह्याबाहेरील ब्लडबँकांना पोलिसांचे आमंत्रण : स्थानिक रक्तपेढ्यांना संधी देण्याची मागणी
- हितेन नाईक
पालघर : जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने रक्तसाठ्याची आवश्यकता पाहता पालघर पोलीस विभागामार्फत रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत, मात्र त्यासाठी जिल्ह्याबाहेरील ब्लडबँकेला पुरस्कृत करण्यापेक्षा जिल्ह्यातील ब्लड बँकांना संधी दिल्यास या रक्तसाठ्याचा उपयोग गंभीर रुग्णांना तात्काळ उपलब्ध होऊ शकतो, याचा पोलीस विभागाने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी जिल्ह्यातील ब्लडबँक व्यवस्थापकांमधून केली जात आहे.
जिल्ह्यात एकूण ७ ब्लडबँका असून जव्हार येथील पतंगशहा कुटीर ब्लडबँक ही एकमेव शासकीय ब्लडबँक आहे. बाकी डहाणू येथील डीके छेडा ब्लडबँक आणि साथीया ब्लडबँक नालासोपारा, महाराष्ट्र ब्लडबँक पालघर, सरला आणि विजया ब्लड बँक वसई, बीएआरसी ब्लडबँक बोईसर अशा ब्लडबँकांद्वारे जिल्ह्यात रक्तदान शिबिरे आयोजित करून जमलेला रक्तसाठा गरजू रक्तदात्यांना वेळोवेळी दिला जातो.
पालघर येथील महाराष्ट्र ब्लडबँक ही संस्था प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजेंद्र चव्हाण आणि त्यांच्या पत्नी वैशाली ऊर्फ लिनीट चव्हाण या अनेक वर्षांपासून चालवीत असून त्याची रक्तदान शिबिरे जिल्ह्यात वर्षभर सुरू असतात. दरम्यान, रक्तसाठा कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे रविवारपासून पालघर, डहाणू, बोईसर, कासा, तलासरी, जव्हार पोलीस ठाण्याअंतर्गत पुढील ८ दिवस रक्तदान शिबिरे भरवली गेली आहेत. या शिबिरांत जे.जे. युनिट मुंबई आणि जव्हार ब्लडबँकेतील डॉक्टरांची पथके सहभागी झाली आहेत. या शिबिरातून जमा झालेला अर्धा रक्तसाठा मुंबईतील रुग्णालयात जाणार आहे. त्याचा मोठा फटका जिल्ह्यातील तात्काळ रक्ताची गरज असणाऱ्या गंभीर रुग्णांना बसू शकतो. त्यामुळे पुढील रक्तदान शिबिरासाठी स्थानिक ब्लडबँकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ अशा भावनेतून आवाहन करीत सामाजिक भान जपत गरजू रक्तदात्यांना रक्तपुरवठा केला जातो. २६/११ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्र ब्लडबँकेकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मंडळांना, सामाजिक संस्थांना पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. सध्या रक्त तुटवडा पाहता पोलीस विभागाने आम्हाला संधी दिली असती तर त्या रक्तसाठ्याचा उपयोग जिल्ह्यातील अनेक रुग्णांना झाला असता.
- वैशाली चव्हाण, व्यवस्थापक, महाराष्ट्र ब्लडबँक, पालघर