...तर मालमत्तांना ठोकणार सील; महापालिकेने बजावल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 02:16 AM2021-02-10T02:16:55+5:302021-02-10T02:17:16+5:30

मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर कारवाई

... then seal the property | ...तर मालमत्तांना ठोकणार सील; महापालिकेने बजावल्या नोटिसा

...तर मालमत्तांना ठोकणार सील; महापालिकेने बजावल्या नोटिसा

Next

ठाणे : एकीकडे कोरोनाचा काळ असतानाही ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आतापर्यंत तब्बल ४९३ कोटींची वसुली केली आहे. परंतु, आता ५० हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या तब्बल सहा हजार २४८ थकबाकीदारांवर कारवाईचे संकट ओढवले आहे. या थकबाकीदारांनी तब्बल १४४.६६ कोटी थकविल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता या नोटिसा बजावून थकबाकी भरली नाही तर मालमत्ता सील करण्याचा इशाराही दिला आहे.

कोरोनामुळे पालिकेचा आर्थिक गाडा घसरला आहे. परंतु मालमत्ता आणि पाणी करातून गोळा होणाऱ्या वसुलीमुळे पालिकेचा गाडा हळूहळू रुळावर येण्यास मदत झाली आहे. मालमत्ता कर ४९३ कोटी आणि पाणीकरातून ११५ कोटींची वसुली झालेली आहे. महापालिकेच्या इतर विभागांना दिलेले टार्गेट अर्ध्यापेक्षा कमी केलेले आहे. त्यातही शहर विकास विभागाने उत्पन्नाच्या बाबतीत अपेक्षाभंग केलेला आहे. कोरोनामुळे शहरातील विकासकामे काही प्रमाणात ठप्पच आहेत. हीच परिस्थिती अग्निशमन, घनकचरा आणि इतर विभागांची झाली आहे. त्यामुळे महापालिकेने कर वसुलीकडे लक्ष केंद्रित केले. कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका न घेता, कारवाई न करता ठाणेकरांना कर भरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार ठाणेकरांनीदेखील महापालिकेच्या आवाहनाला साद देऊन ४९३ कोटींचा भरणा केला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत थकबाकी भरल्यास दंडावर १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेचा अनेकांनी लाभदेखील घेतला आहे.

महापालिकेने विविध उपाय केल्यानंतर आता मात्र ज्यांची थकबाकी ५० हजारांपेक्षा जास्तीची असेल त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार अशा सहा हजार २४८ थकबाकीदारांना नोटीस बजावून पुढील १५ दिवसांची मुदतही दिली आहे. परंतु तरीही थकबाकी भरली नाही तर मात्र या मालमत्ता सील केल्या जाणार आहेत.

चार महिन्यांत ११९ कोटी ६७ लाख जमा; ठामपाच्या मोबाइल व्हॅनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
ठाणे : कोरोना काळात मालमत्ता कर भरण्यासाठी कॅशलेसला पसंती देणाऱ्या ठाणेकरांनी मोबाइल व्हॅनलादेखील चांगला प्रतिसाद दिला आहे. या व्हॅनच्या मध्यमातून चार महिन्यात ११९ कोटी ६७ लाखांचा मालमत्ताकर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. आतापर्यंत एक हजार ३४४ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

नागरिकांना त्यांच्या दारातच मालमत्ताकर भरता यावा यासाठी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या मोबाइल व्हॅन उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. करदात्याच्या दारी जाऊन तो वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने स्मार्ट कर संग्रह प्रणाली ही मोबाइल व्हॅन तयार केली आहे. ती पूर्णत: रिझर्व बँक ऑफ इंडिया यांचे प्रमाणकानुसार असून यामध्ये संगणक, प्रिंटर व त्याकरता लागणाऱ्या सर्व सुविधा तसेच ऑपरेटर, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकही पुरवले आहेत. याबाबतचा सर्व खर्च बँक ऑफ महाराष्ट्रने केला आहे. या व्हॅनद्वारे एखाद्या गृहनिर्माण संस्थेमध्ये मालमत्ताकर वसूल करावयाचा असल्यास सदर व्हॅन त्या प्रभाग कार्यालयाकडे पाठवण्यात येते. तीद्वारे करदात्यांनी मालमत्ताकर देयकाची मागणी केल्यास तेसुद्धा देण्यात येत आहे. यामध्ये रोखीने, धनादेश, धनाकर्ष अथवा डेबिट कार्ड, एटीएम कार्डनेदेखील भरण्याची व्यवस्था आहे. कर भरल्यानंतर पावती देण्याची व्यवस्थाही आहे.
१५ ऑक्टोबरपासून १० प्रभाग समित्यांमध्ये ती फिरत असून आतापर्यंत १३४४ नागरिकांनी आपला मालमत्ता कराचा भरणा केला आहे. 

मागणी केल्यास व्हॅन येणार गृहसंकुलात
एखाद्या गृहनिर्माण संस्थेने मालमत्ताकर भरणोकरिता व्हॅनची मागणी, विनंती केल्यास ती संबंधित गृहनिर्माण संस्थेमध्ये पाठवण्यात येणार असून, मालमत्ताकराचे संकलन करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी अथवा इतर दिवशी संस्थेमध्ये कॅम्प राबविण्यात येत असून या वसुलीसाठी या व्हॅनचा उपयोग केला जात आहे.
 

Web Title: ... then seal the property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.