...तर बिझनेस हब उभारून देऊ, एमएमआरडीएचा एपीएमसीला प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 11:34 PM2019-06-13T23:34:25+5:302019-06-13T23:34:47+5:30
एमएमआरडीएचा एपीएमसीला प्रस्ताव : समिती घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय
कल्याण : मेट्रो रेल्वेचे कारशेड व जंक्शन उभारण्यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने (एपीएमसी) त्यांची जागा दिल्यास तेथे बिझनेस हब उभारून बाजार समितीला नवे रूप दिले जाईल, असा प्रस्ताव एमएमआरडीएने बाजार समितीसमोर ठेवला आहे. मात्र, हा प्रस्ताव व्यापारी व शेतकऱ्यांच्या हिताचा असल्यास त्याचा नक्कीच विचार केला जाईल, असे समितीने स्पष्ट केले आहे.
कल्याण एपीएमसीची ४० एकर जागा आहे. त्यात फूलबाजार, अन्नधान्य बाजार, फळबाजार, भाजीपाला बाजार, शेतमालाचा लिलाव, कांदा बटाटा बाजार आदीसाठी जागा आहे. या जागेत फूल बाजारासाठी नवीन इमारत बांधली जाणार आहे. सध्या बाजार समितीचे कार्यालय आणि फळ बाजार, अन्नधान्य बाजार, कांदा बटाटा बाजार, भाजीपाला बाजार हे विविध गाळ्यांमध्ये सुरू आहेत.
एमएमएमआरडीएने ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वेचा प्रकल्प हाती घेतले आहे. कल्याण एपीएमसी हे या मेट्रो रेल्वेचे शेवटचे रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मेट्रोचे कारशेड व जंक्शन बाजार समितीच्या जागेत विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, मेट्रो कारशेड व जंक्शन एमएमआरडीएला जागा देण्यास बाजार समितीच्या आधीच्या संचालक मंडळ व सभापतींनी विरोध केला होता. बाजार समितीची जागा व्यापारी व शेतकरी वर्गाकरिता आहे. त्यामुळे ती मेट्रोच्या कारशेड व जंक्शनसाठी देता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित केल्याने एमएमआरडीएने कारशेडसाठी जागा शोधण्यास सुरुवात केली. त्यानुसार कारशेड कोन गावात करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. प्रत्यक्षात मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक कल्याण एपीएमसी असताना कारशेड कोन गावात विकसित करणे म्हणे द्राविडी प्राणायम ठरणार होते.
बाजार समितीची मार्चमध्ये निवडणूक झाली. त्यानंतर नवीन सदस्य मंडळ निवडून आले. एपीएमसीचे नवीन सभापती कपिल थळे यांना एमएमआरडीएने कारशेडच्या जागेसंदर्भात चर्चेसाठी नुकतेच मुंबईतील कार्यालयात पाचारण केले होते. या चर्चेवेळी बाजार समितीने कारशेड व जंक्शनसाठी जागा दिल्यास तेथे व्यापारी वर्गासाठी तीन मजली इमारत विकसित करून दिली जाईल. तेथे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिझनेस हब विकसित केले जाईल. या संकुलात व्यापाºयांचे पुनर्वसन केले जाईल. त्याचा आर्थिक बोजा बाजार समितीवर टाकला जाणार नाही, असा प्रस्ताव एमएमआरडीएने थळे यांच्यासमोर ठेवला. थळे यांनी प्राथमिक चर्चा केली असली तरी व्यापारी व शेतकºयांच्या हिताला बाधा येणार नाही, असाच निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत विकास
च्स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास केला जाणार आहे. त्याकरिता स्मार्ट सिटी कंपनीने ३९५ कोटींची निविदा दुसºयांदा मागविली आहे. ही निविदा २५ जूनला उघडली जाणार आहे.
च्स्टेशन परिसराच्या विकासात स्टेशन परिसर, एसटी बसडेपोचा विकास आणि बाजार समिती जागेत प्रस्तावित असलेले मेट्रोचे स्टेशन, कारशेड आणि जंक्शन बांधले जाणार आहे.
च्कल्याण स्थानकातून बस डेपोत जाता येईल. तेथे पार्किंगची व्यवस्था असेल. तसेच मेट्रो स्टेशनशी बस डेपो व कल्याण रेल्वे स्टेशन जोडले जाणार आहे. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव हा बाजार समितीतील मेट्रो स्थानकापर्यंत जोडून घेणारा आहे.