...तर स्काडाने तारले असते
By admin | Published: November 12, 2015 01:39 AM2015-11-12T01:39:28+5:302015-11-12T01:39:28+5:30
भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती
ठाणे : भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती आणि चोरी या गोष्टीदेखील गांभीर्याने घेण्याची गरज ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. शहरात आजघडीला गळतीचे प्रमाण हे ४५ टक्के असून २००८-०९ साली पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आणलेली स्काडा ही प्रणाली तेव्हाच राबविली असती तर कपातीचे प्रमाणदेखील कमी असते. ही यंत्रणा पुन्हा राबवावी, अशी मागणी ‘जाग’ या संस्थेने केली आहे.
ठाणे शहराला आजच्या घडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना कपातीचा सामना करावा लागत असून योग्य नियोजन नसल्यानेही पाणी वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत. तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट होणाऱ्या गळतीमुळे निर्माण झाली आहे. २००८-०९ साली जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला स्काडा यंत्रणा राबवण्यासाठी ८ ते ९ कोटी रु पयांचे अनुदान प्राप्त झाले होते. शहरातील कचरा आणि पाण्याची अद्ययावत पद्धतीने नियोजन करण्याची अट यामध्ये टाकली होती. ही संपूर्ण यंत्रणा ठेकेदाराच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. यासाठी एका कंट्रोल रूमचीदेखील निर्मिती केली होती. विविध स्रोेतांपासून येणारे पाणी आणि कोणत्या टाकीमध्ये ते किती आहे, या सर्व गोष्टींचे मोजमाप तिच्या माध्यमातून करण्यात येणार होते. मात्र, ही यंत्रणा पालिकेला राबवता आली नसल्याची माहिती संस्थेचे मिलिंद गायकवाड यांनी दिली.