...तर दूध व्यावसायिक संघटनेचा संपाला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 02:58 AM2018-07-19T02:58:50+5:302018-07-19T02:59:01+5:30
राज्यभरात पुकारलेल्या दूधबंद आंदोलनामुळे ठाणे शहरात बुधवारीही २० टक्के दूध तुटवडा होता.
ठाणे : राज्यभरात पुकारलेल्या दूधबंद आंदोलनामुळे ठाणे शहरात बुधवारीही २० टक्के दूध तुटवडा होता. सरकारने दोन दिवसांत यावर योग्य तोडगा न काढल्यास या आंदोलनाला पाठिंबा देणार असून यात ५०० दूधविक्रेते असतील, अशी भूमिका ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने घेतली आहे.
आंदोलनामुळे मंगळवारी २० टक्के दूध कमी आले. बुधवारीही तीच परिस्थिती शहरात होती. परंतु, ग्राहकांनी जादा दूध घेतले नाही, असे संघटनेने सांगितले. आंदोलनाच्या भीतीने दोन दिवस विक्रेत्यांनी दूध साठवून ठेवले होते. हा साठा संपत आल्यामुळे दुधाच्या खरेदीविक्रीवर गुरुवारी परिणाम जाणवू शकतो, असे संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेले आंदोलन हे योग्यच आहे. दोन दिवसांत याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्हीही या आंदोलनाला पाठिंबा देऊन यात उतरू, असा इशारा चोडणेकर यांनी दिला.
संपकाळात दूधविक्रेत्यांनी ग्राहकांना छापील किमतीपेक्षा जास्त दराने दूध विकू नये. अन्यथा, त्यांच्यावर संघटनेमार्फत कारवाई केली जाईल, अशा इशारा दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेने दिला आहे. जादा किमतीने दुकानदाराने दूध विकल्यास त्याला आमची संघटना जबाबदार राहणार नाही, असे चोडणेकर यांनी सांगितले.