...तर विरोधकांची शुगर वाढविणार, आरोग्यमंत्री सावंत यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 09:00 AM2023-04-23T09:00:23+5:302023-04-23T09:00:58+5:30
काही महिन्यांपूर्वी हाफकीनच्या मुद्द्यावरून सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : हाफकीनवरून मला डिवचले जात आहे. मी स्वत: इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून, साखरनिर्मितीमध्ये पीएच.डी. केली आहे. मी स्वत: संशोधक असल्यामुळे मला डिवचू नका, अन्यथा तुमची शुगर वाढविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना दिला.
काही महिन्यांपूर्वी हाफकीनच्या मुद्द्यावरून सावंत यांची खिल्ली उडविण्यात आली होती. त्याचा समाचार शनिवारी त्यांनी ठाण्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपुजन सोहळ्याच्या निमित्ताने घेतला. सावंत म्हणाले की, मी १९८६ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. त्यानंतर लेक्चरर म्हणून काम केले. पुण्यात २००१ पासून १०० इन्स्टिट्यूट चालवत आहे. २००८ मध्ये पहिला साखर कारखाना काढला. त्यानंतर त्याचे आठ कारखाने झाले आहेत. कोणाकडून विकत घेतले नसल्याचे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली. संशोधक असल्याने आरोग्य विषयाचे प्राधिकरण तयार करीत आहे. १० दिवसांत ते प्राधिकरण अस्तिवात येईल. येत्या काळात महाराष्ट्र हेल्थ कार्ड उपलब्ध केले जाईल. जिल्हा रुग्णालयाचे काम १८ महिन्यांत पूर्ण झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. टास्क फोर्सची बैठक शुक्रवारी घेतली असून, १५ मेपर्यंत कोरोना ओसरलेला दिसेल, असा दावा सावंत यांनी केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले की, बदलापूरचे रुग्णालय १०० बेडचे करावे, शहापूर उपजिल्हा रुग्णालय करावे, खर्डी येथे ट्रॉमा सेंटर सुरू करावे.