...तेव्हा गद्दारांना जेलमध्ये भरणार, दिघेंच्या शक्तीस्थळी शपथ; आदित्य यांचा 'ठाकरी' बाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:27 PM2023-04-05T21:27:35+5:302023-04-05T21:28:57+5:30
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता
ठाणे - ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यापूर्वी या बालेकिल्याला मानत होते. परंतु आता ते मानत नाही. त्यामुळे याच ठाण्यात मी या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढायला तयार असल्याचे सांगत शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुले आव्हान दिले आहे. तुम्ही मला निवडून द्या मी राज्याला छळमुक्त केल्याशिवाय राहणार नाही, असा एल्गारच आदित्य यांनी ठाण्यातून पुकारला. यावेळी, गद्दारांना जेलमध्ये भरल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना दोन दिवसापूर्वी झालेल्या मारहाणीनंतर बुधवारी ठाण्यात महाविकास आघाडीचा जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर, आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर झालेल्या सभेत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिलेवर अत्याचार होत असतांना मुख्यमंत्री एक शब्दही बोलत नसल्याचे आर्श्चय वाटते. आजही, मोर्चा काढतांनाही काही अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मी इथे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी नाही तर कौतुक करण्यासाठी आल्याचे सांगत आदित्य यांनी टीकेची झोड उठविली.
मिंदेच्या लोकांनी, चिंदीचोरींनी एका महिलेला मारहाण केली. मात्र तिची तक्रार घेतली नाही उलट तिच्याविरोधातच गुन्हा दाखल होतो, हा कोणता न्याय असा सवालही त्यांनी केला. तक्रार करण्यासाठी गेलो असता, पोलीस आयुक्तही पळून जातात, पण याबद्दल कोणाला काय बोलणार कारण ज्यांच्या पक्षाचे सरकार आहे, त्यांनी पक्ष चोरलेला आहे, त्यामुळे हा चोरांचाच पक्ष असू शकतो, नाही तर चोरांची टोळीच असे कृत्य करु शकते असे म्हमत आदित्य यांनी निशाणा साधला. राज्याचे मुख्यमंत्री आहेत कुठे ते राज्याचे नाही तर गुजरात आणि गुहाटीचे मुख्यमंत्री आहेत. त्यातही महाराष्ट्रालला मुख्यमंत्री लाभाला नसून गुजरातला दोन मुख्यमंत्री लाभल्याने त्यांचे अभिनंदन करतो अशी घणाघाती टीका करत आदित्य यांनी शिंदे गटाला इशाराही दिला.
गद्दारांना जेलमध्ये भरणार
तुम्हाला आज सांगतोय मी, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, तर काही तासांचं आहे. पडल्यानंतर सगळ्यांची मोजमापं करणार. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण जे लोकांसाठी गरजेचं आहे, ते केल्याशिवाय राहणार नाही हेच आज सांगायला इथे आलोय, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर व महायुती सरकारवर निशाणा साधला. जे कोणी अधिकारी असतील, आयएएस असतील, आयपीएस असतील, त्या गद्दार गँगमधील चिलटी असतील, त्यांना सांगतोय मी. सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन घेणार आहे. आंदोलन नव्हे, हे आंदोलनजीवी नाहीत, तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये भरणार, हीच शपथ घ्यायला दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर मी आलोय, असे म्हणत आदित्य यांनी ठाकरी शैलीत शिंदे गटावर निशाणा साधला.