...तेव्हा अमराठी विकासकांची रांग का होती?, आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाडांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 05:23 PM2022-07-30T17:23:34+5:302022-07-30T17:24:38+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला.
ठाणे :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही. मात्र सत्तेत कॉंग्रेस बरोबर आल्यानंतर स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान केला. त्यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे कोणाला सलाम करत होते. असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मंत्री असतांना त्यांनी किती मराठी विकासक त्यांच्या कार्यालयात होते. शिवाय उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिकेत किती मराठी कंत्नाटदारांना काम दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाच्या कष्टाने घामाने, हौत्याम्याने, देशात मुंबई आर्थिक राजधानी झालेली आहे. त्यामुळे कोणीही व्यक्तीने कुठल्याही पदावर बसून मराठी माणूस, संस्कृती, भाषा याला नखही लावण्यास त्याचा विपर्यास होईल अशी स्थिती आणू नये असे आमचे स्पष्ट मत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुप्रिया सुळे यांनी जास्तीचा अभ्यास केला तर त्यांचे मत स्पष्ट होईल. राज्यपालाच्या वक्तव्यांची आम्ही असमहती दर्शवितो पण, जेव्हा तुम्ही कॉंग्रेस बरोबर होतोत, आणि तुमचे सरकार होते, त्यावेळेस कुठल्या राज्यपालाने अर्थसंकल्प मराठीत वाचून दाखविला असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला. कोश्यारी सोडून कोणत्याही राज्यपालांनी अर्थसकंल्प मराठीत वाचून दाखविलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या छत्रपतींच्या किल्यांवर पायी वर र्पयत जाऊन नतमस्थक होण्याचे काम कोश्यारी सोडून कोणत्या राज्यपालाने केले याचेही उत्तर द्यावे असे त्यांनी सांगितले. केवळ एका वक्तव्यावर लगेच राजकीय पोळी भाजण्याची टीवटीव तुम्ही करु नका असेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरी चप्पल आणि जोडे मारो आंदोलनाची एवढीच खुमखुमी असेल तर सावरकरांचा अपमान केल्यावर त्या मनीशंकरला जोडे मारण्याचा कार्यक्रम बाळासाहेबांनी केला, कॉंग्रेस बरोबर महाविकास आघाडीत आल्यावर कॉंग्रेसने जी अभद्र भाषा वापरली, त्यानंतर तुमच्या हातात ते जोडे का नाही आले असा सवाल त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना केला. जोडे मारायचेच असतील आणि माफीची मागणीच करायची असतील तर बरेच विषय समोर येतील आणि शिवसेनेची पळता भुई थोडी होईल असा टोलाही त्यांनी लगावला.
आव्हाडांनी केलेल्या टिकेलाही त्यांनी प्रतिउत्तर यावेळी दिले. आव्हाड आणि मराठी माणसाच्या हिताचा संबध काय? असा थेट सवाल त्यांनी केला. गृहनिर्माणमंत्री असतांना त्यांच्या दालनात अमराठी विकासकांची रांग का होती?, त्यावेळेस त्यांच्या बंगल्या समोर ज्या चपला आणि जोडे होते, त्या मराठी विकसकांचे होते की, अमराठी विकासकांचे होते असा सवालही त्यांनी केला. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे, परंतु शब्दाच्या मर्यादा या प्रत्येकालाच पाळाव्या लागतील, त्यामुळे अशा प्रकारचा शब्द आव्हाड वापरत असतील तर ते मर्यादेचे आत आहे की बाहेर हे जनतेला कळेल, असे त्यांनी सांगितले. माफीचा उद्योग करायचा असेल तर ब:याच माफ्या मागाव्या लागतील, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असतांना कोणत्या विकासकाला थंड हवेचे ठिकाण विकसित करायला दिले होते त्यांची माफी मागणार का?, मुंबई महापालिकेत २५ वर्षात एकाही मराठी कंत्रटदाराला येऊ दिले नाही, याचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल. असेही त्यांनी शेवटी सांगितले.