रात्रशाळांकडेही विद्यार्थ्यांचा वाढतोय कल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:06 AM2019-09-30T01:06:00+5:302019-09-30T01:12:36+5:30
शिक्षणाचा प्रसार सर्वदूर व्हावा आणि दिवसभर नोकरी करणाऱ्यांनाही विद्यार्जनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून रात्रशाळांचा जन्म झाला.
शिकण्याची प्रत्येकाला आवड असते. पण परिस्थितीमुळे शिकता येत नाही. घरची जबाबदारी अंगावर पडल्याने त्यांना नोकरी करावी लागते. पण नोकरी करून शिकणाऱ्यांसाठी रात्रशाळा, रात्रमहाविद्यालय सुरू झाले. याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. वेतनेत खर्चासाठी होणारी परवड, शिक्षकांची कमतरता अशा काही समस्या असून नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले आहे ‘लोकमत’चे प्रतिनिधी स्नेहा पावसकर,
प्रशांत माने आणि कुमार बडदे यांनी.
शिक्षणाचा प्रसार सर्वदूर व्हावा आणि दिवसभर नोकरी करणाऱ्यांनाही विद्यार्जनाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून रात्रशाळांचा जन्म झाला. रात्रशाळांच्या व्यवस्थेत काही त्रुटी असल्यातरी विद्यार्थ्यांसाठी जिद्दीने काम करणारे शिक्षक त्याठिकाणी कार्यरत असल्याने आजही काही रात्रशाळा तग धरून आहेत. राज्य सरकारकडून अनुदान मिळत असले तरी त्यातून शिक्षकांचे वेतन दिले जाते, परंतु वेतनेत्तर खर्च हा शिक्षकांनाच भागवावा लागतो ही वस्तूस्थितीही पाहयला मिळते. समाजातील दुर्बल व गरजू घटकातील विद्यार्थी रात्रशाळेत आणि महाविद्यालयांमध्ये शिकतात. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट खालावलेला दिसत असलातरी रात्र महाविद्यालयांमध्ये मात्र शिकणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात आढळते. एकीकडे हा कल वाढत असलातरी रात्रशाळा आणि रात्र महाविद्यालयांकडे बघण्याची पालकांची जी मानसिकता आहे त्यात बदल झाला पाहिजे याकडेही संस्थाचालकांकडून लक्ष वेधले जात आहे.
रात्रशाळा ही काळाची गरज आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने अकाली वयातच एकाचवेळी शिक्षण आणि काम अशी दुप्पट मेहनत करूनच जगण काही विद्यार्थ्यांच्या वाटयाला येते. त्या परिस्थितीत बुध्दीपेक्षा श्रमालाच जास्त आलेले मोल पाहता दिवसभर नोकरी करून रात्री शिक्षण घेण्याची संधी रात्रशाळा आणि महाविद्यालयांमुळे अशा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मिळते. कल्याण- डोंबिवली शहरातील आढावा घेता याठिकाणी सद्यस्थितीमध्ये दोन ते तीन रात्रशाळा आणि दोन रात्र कनिष्ठ महाविद्यालये व रात्र महाविद्यालये कार्यरत आहेत. अनुदानाच्या व्यतीरिक्त काही शाळा, महाविद्यालयांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नसताना स्वखर्च आणि प्रामाणिकपणे काम करणाºया शिक्षकांमुळे तसेच संस्थांच्या माध्यमातून रात्रशाळा आणि महाविद्यालये कार्यरत असल्याचे पाहयला मिळते. कल्याण क्षेत्राचा विचार करता याठिकाणी ग्रामीण भागाची व्याप्ती अधिक प्रमाणात आहे. एकीकडे शेतीची कामे दिवसा सुरू असताना, शहरातील कारखाने तसेच कंपन्यांमध्ये व्यवसायानिमित्त ग्रामीण परिसरातून येणाºयांची संख्याही मोठी आहे. रात्रशाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयापर्यंतच शिक्षण याठिकाणी घेता येते, असे नाही तर महाविद्यालयाची डिग्रीही आता मिळविणे शक्य झाले आहे.
रात्रशाळांचा आढावा घेता कल्याणमधील रामबाग आणि नेतीवली परिसरात रात्रशाळा आहेत. पश्चिमेकडील रामबाग येथील सिध्दार्थ रात्रशाळा ही अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने चालविली जाते. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण देण्याबरोबरच याठिकाणी ११ वी आणि १२ वी पर्यंत शिक्षण देणारे रात्र कनिष्ठ महाविद्यालयही चालविले जाते. सरकारकडून मिळणाºया अनुदानावर शिक्षकांचे वेतन दिले जाते, परंतु वेतनेत्तर खर्च हा शिक्षकांनाच भागवावा लागतो. याठिकाणी अंदाजे १५० विद्यार्थी शिकत असून यात विद्यार्थीनीही आहेत. महत्वाचे म्हणजे महिला शिक्षिकाचींही याठिकाणी नेमणूक करण्यात आली आहे. पुरेसे शिक्षक असल्याचा दावा येथील प्रभारी प्राचार्य डी. पांढरे यांनी केला आहे.
दुसरी रात्रशाळा ही पूर्वेकडील नेतीवली परिसरात आहे. केडीएमसीच्या प्रबोधनकार ठाकरे विद्यालयात ही उन्नती रात्रशाळा चालते. सायंकाळी सात ते रात्री दहापर्यंत आठवी ते दहावीचे वर्ग चालणाºया या शाळेत शिकविण्याची जबाबदारी सागर चौधरी या एकमेव शिक्षकावर येऊन ठेपली आहे. याला मे २०१७ मध्ये सरकारच्या निघालेला अध्यादेश कारणीभूत असल्याचे बोलले जाते. एकाच ठिकाणी शिक्षकाने कार्यरत राहिले पाहिजे असा नियम काढण्यात आल्यावर या शाळेतील बरेचसे शिक्षक कमी झाले. सद्यस्थितीला केवळ चौधरी हेच याठिकाणी शिकवित आहेत. गेल्यावर्षीपर्यंत सव्वाशेपर्यंत असलेली विद्यार्थी संख्या आज ७० पर्यंत खाली आली आहे.
अतिरिक्त शिक्षक देण्यात यावेत अशी मागणी वारंवार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांचे एकप्रकारे नुकसान होत असल्याचे याठिकाणी पाहयला मिळते. येथे शिक्षकेत्तर कर्मचाºयांची संख्याही कमी आहे. १० ते १५ मुलींचाही यात समावेश आहे. शिकण्यासाठी प्रचार केला जात असला तरी विद्यार्थी शाळेत टिकविण्यासाठी दिल्या जाणाºया सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव उन्नती रात्रशाळा पाहता समोर येते.
महाविद्यालयांमध्ये अच्छे दिन
ठाणे जिल्हयातील पहिले रात्र महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या डोंबिवलीमधील स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालयात कॉमर्स आणि आर्टसचे पदवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. १९९८ पासून हे महाविद्यालय चालविले जात असून सद्यस्थितीला ९०० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. यातील ९० टक्के विद्यार्थी व्यवसाय करणारे असून डोंबिवलीसह कल्याण, टिटवाळा तसेच बदलापूर परिसरातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे महाविद्यालय चालविले जात आहे, असे सांगण्यात आले.
सायंकाळी सहा ते रात्री दहा अशी महाविद्यालयाची वेळ आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा पळसुले- देसाई या असून पदवीपर्यंचे शिक्षण देण्याबरोबरच स्पर्धा परीक्षांचे शिक्षण तसेच स्वसंरक्षणाचे धडेही दिले जातात. लायब्ररी, रिडींग रूम आदी सुविधा आहे, परंतु याठिकाणी कॅन्टीनची व्यवस्था नाही. त्यामुळे कामावरून थेट महाविद्यालयात येणाºयांची गैरसोय होते. विशेष बाब म्हणजे याठिकाणी तरूण वर्गच नाहीतर ५६ वयापर्यंतचे विद्यार्थीही शिक्षण घेत आहेत. दोनदा आयएसओ मानांकन या महाविद्यालयाला मिळाल्याचे पळसुले- देसाई यांनी सांगितले.
दुसरे रात्र महाविद्यालय कल्याण येथील बिर्ला महाविद्यालयाच्या वतीने चालविले जात आहे. आॅगस्टपासून हे महाविद्यालय सुरू करण्यात आले असून याठिकाणी सद्यस्थितीला १०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथे कॉमर्स, आर्टस आणि सायन्स पदवीपर्यंचे शिक्षण दिले जात असून एक अंध विद्यार्थीही शिक्षण घेत आहे. सायंकाळी पाच ते नऊ पर्यंत वर्ग चालविले जातात. कल्याण डोंबिवलीबरोबरच कर्जत, कसारापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्मार्ट क्लाससह लायब्ररी, जिमखाना या सुविधांसह कॅन्टीनची व्यवस्थाही याठिकाणी आहे.
ज्या सुविधा दिवसा सुरू असणाºया महाविद्यालयांना मिळतात त्या सर्व रात्र महाविद्यालयातही मिळतात असा दावा येथील प्राचार्या डॉ. स्वप्ना समेळ यांनी केला आहे. रात्र महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतोय, आमच्याकडे मुलीही शिक्षण घेत आहेत. परंतु पालकांची रात्रशाळा आणि महाविद्यालयांकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे तो बदलला पाहिजे असे प्राचार्या समेळ यांनी सांगितले.
दरम्यान, रात्रशाळांच्या मानाने या दोन्ही रात्र महाविद्यालयांचा आढावा घेता याठिकाणी सर्वकाही आलबेल असल्याचे पाहयला मिळाले.
कला शाखेचे वर्ग सुरू करणार
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ असलेले हे रात्र महाविद्यालय २००१ मध्ये श्रीमंती एफ.एम.एस एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तसेच ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी.डी.शिंदे यांनी सुरु केले. सेंट जोन्स शाळेमध्येच रात्र महाविद्यालयाचे वर्ग भरतात. या महाविद्यालयात विद्यार्थी मोठ्या संख्येने येतात. त्यांना याचा फायदा होत आहे.
कामव्यवयास करून शिकणाºया विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते. या महाविद्यालयात फक्त ५०० रु पये भरून नाव दाखल करण्याची तसेच विद्यापीठाची फी हप्त्यामध्ये (वर्षभरात) भरण्याची सुविधा उपलब्ध करु न देण्यात आली आहे. महाविद्यालयात आज विविध शहरातील २५० विद्यार्थी वाणिज्यचे शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले.
या महाविद्यालयामधून अपूर्ण राहिले शिक्षण पूर्ण केलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळाली असल्याची अभिमानास्पद गोष्ट शिंदे यांनी सांगितली. मुंब्रा येथे विजेचा नेहमीच लंपडाव सुरू असतो. येथे कधीही वीज जाण्याच्या घटना घडतात. अशावेळी अभ्यासात व्यत्यय येऊ नये यासाठी महाविद्यालयात इन्व्हरटरची व्यवस्था करण्यात आली आहे.
महाविद्यालयात शिकण्यासाठी येणाºया विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अकाऊंट आणि फायनान्स या विषायावरचे वर्ग पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे प्रस्तावित असून,लवकरच कला शाखेचे वर्गही सुरु करण्यात येणार आहेत. एका बाजूला अशी महाविद्यालये चालवणे कठीण असताना दुसरीकडे कला शाखा सुरू होणे कौतुकास्पद आहे.
राज्य सरकार आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीने या महाविद्यालयात स्वयंरोजगार आणि औद्योगिकरणासाठी आवश्यक असलेले समुपदेशन केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य धनंजय पष्टे यांनी दिली. काम करून शिकणाण्याची इच्छा असणाºयांची संख्या पाहून सरकारने रात्रशाळा, महाविद्यालयांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
‘त्या’ जीआरने लागली उतरती कळा
शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीअभावी नियमित शाळांमध्ये शिक्षण न घेता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केलेली पर्यायी व्यवस्था म्हणजे रात्रशाळा, रात्रमहाविद्यालये. या अर्धवेळ असणाºया शाळेतही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी अनेक शिक्षक मेहनत घेतात. ठाणे शहरात सध्याच्या घडीला रात्रशाळा आणि रात्रमहाविद्यालये सुरू असली तरी काही महाविद्यालयांना विद्यार्थी मिळवण्यासाठी दरवर्षी कॅम्पेनिंग करावे लागते. काही महाविद्यालये ग्रॅन्ट मिळवण्यासाठी सरकार दरबारी झगडत आहेत तर शहरातील एक शाळा नवीन जीआरमुळे बंद पडलेली आहे.
ठाण्यात पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे भारत नाइट स्कूल आहे. या नाइट स्कूलची स्थापना १९५० मध्ये झाली. सुरूवातीला ५ वी ते १० वीपर्यंतचे वर्ग या नाइट स्कूलमध्ये चालायचे. साधारण ८० च्या दशकापर्यंत हे वर्ग सुरू होते. मात्र त्यानंतर येथे ८ वी ते १० पर्यंतचे वर्ग घेतले जायचे. दिवसा नोकरी करणारे, घरची परिस्थिती हलाखीची असणारे किंवा काही कारणास्तव शिक्षण मध्येच अर्धवट सोडलेले अनेक विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेत असत. कोणतीही फी त्यांच्याकडून घेतली जात नसे. काही वर्षांपूर्वी ठाणे महापालिकेचा होमगार्ड कर्मचारी याच स्कूलमधून दहावी उत्तीर्ण झाला होता.
४७ वर्षीय एक गृहस्थ पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले होते तेही याच नाइट स्कूलमधून. एकूणच या शाळेचा निकाल चांगला लागत होता. मात्र २०१७ मध्ये सरकारने काढलेल्या एका जीआरनुसार दुबार काम करणाºया शिक्षकांना रात्रशाळेत काम करण्याची मनाई करण्यात आली. भारत नाइट स्कूलमध्ये ५ शिक्षक आणि १ मुख्याध्यापक कार्यरत होते. मात्र ते दुबार या गटात मोडत असल्याने त्यांना सेवा देण्यापासून थांबवले. परिणामी मुलांच्या शिक्षणप्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या.
महाराष्टÑ रात्रशाळा- प्रशाळा संघटना यांनी या निर्णयाला विरोध केला आणि पर्यायी शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी केली. मात्र अद्यापपर्यंत या नाइट स्कूलमध्ये शिक्षक नेमलेले नाही. तरीही अवघ्या एका शिक्षकाच्या आधारावर आणि इ लर्निंगची जोड देत त्यावर्षी मुलांना शिकवले गेले. मात्र यावर्षीपासून हे नाइट स्कूल बंद आहे. २०१७ मध्ये आलेल्या या जीआरमुळे ठाणे-मुंबईतील बहुतांश रात्रशाळा बंद झाल्या असून या शाळांमध्ये शिकणाºया मुलांचे भवितव्यही अंधारमय झाले आहे.
साधारण १९९० पासून सुरू असलेली कळव्यातील रात्रशाळा म्हणजे कळवा नाइट स्कूल. ८ वी ते १० वी अशा तीन इयत्तांचे वर्ग येथे चालतात. एका तुकडीत प्रत्येकी २५ ते ३० विद्यार्थी असतात. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत चालणाºया नाइट स्कूलमध्ये ३ शिक्षक, १ मुख्याध्यापक, १ लिपीक आणि १ शिपाई आहे. दिवसा कष्ट करून आपला आणि प्रसंगी कुटुंबाचा चरितार्थ चालवणारी मुलंच नाइट स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. या स्कूलमध्ये अगदी मुंबई, नवी मुंबईतूनही काही विद्यार्थी येतात. सरकारकडून मिळणाºया अनुदानाबाबत बोलताना शिक्षकांनी सांगितले, हे नियमित शाळांच्या तुलनेत कमी असले तरी त्यातच शाळेचा खर्च भागवावा लागतो. प्रसंगी मुलांची पुस्तके किंवा इतर सोयींसाठी शिक्षक स्वत:कडचे पैसेही खर्च करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
२००५ साली ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज कला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य कनिष्ठ रात्र महाविद्यालय याची स्थापना करण्यात आली. सुरूवातीच्या काळात महाविद्यालयाला मान्यता मिळवण्यापासून ते इतरही अनेक गोष्टींमध्ये बराच काळ गेला. २०११ मध्ये या महाविद्यालयाची बारावीची पहिली बॅच परीक्षा देऊन बाहेर पडली. अकरावी, बारावी या दोन वर्गात मिळून सध्या १०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. त्यात मुलींचे प्रमाण ३० ते ३५ टक्के इतके आहे. नियमित दिवसशाळांच्या तुलनेत रात्रशाळांमध्ये शिकणाºया मुलांकडे काहीशा संकुचित नजरेने पाहिले जाते.
त्यामुळे आजही नवीन प्रवेशासाठी महाविद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षकांना कॅम्पेनिंग करावे लागते. मात्र या नाइट कॉलेजमधून शिक्षण घेत अनेक मुलांनी उत्तम यश मिळवलेले आहे. ठाणे समाजकल्याण विभागामार्फत बारावीत उत्तम गुण मिळवणाºया विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरवले जाते. हा पुरस्कार सातत्याने २०१५, २०१६, २०१७ अशा मागील तीन वर्षात याच नाइट कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी पटकावलेला आहे. आमच्या नाइट कॉलेजमध्ये येणाºया मुलांमधील अनेक मुले ही अभ्यासू आणि मेहनती असतात.
त्यांना केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज असते आणि प्रसंगी एखादा विद्यार्थी तो राहत असलेल्या आजूबाजूच्या परिस्थितीमुळे वाम मार्गाला गेला तर त्याचेही आम्ही वेळीच समुपदेशन करून त्याला परिस्थिती आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. आमच्या महाविद्यालयाला अद्याप ग्रॅन्ट मिळालेली नाही. सरकारी अनुदान मिळावे म्हणून आम्ही २००७ पासून प्रयत्न करतोय, ते मिळाले तर मुलांना आणखी चांगल्या सुविधा देऊ शकू, असे महाविद्यालयाचे प्राचार्य परमेश्वर भालेराव यांनी सांगितले.