दूषित पाणी प्यावे लागत असल्याने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:51 AM2019-04-26T00:51:06+5:302019-04-26T00:51:20+5:30
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, टँकरने पुरवठा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
- रोहिदास पाटील
अनगाव : भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पोगाव, ब्राह्मणपाडा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासीपाड्यात पावसाळा संपल्यापासून येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील नागरिकांना खड्ड्यातील दूषित पाणी प्यावे लागत असल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
भिवंडी पालिकेच्या प्रभाग-१ मध्ये हा पाडा येतो. या पाड्यात १५ वर्षांपासून नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे पाणीपुरवठा विभागाने बोअरवेल व विहीरही केलेली नाही. त्यामुळे येथील आदिवासी कुटुंबांना खड्ड्यातील दूषित पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. पाण्यासह इतर सुविधांचीही येथे वानवा आहे. ज्या महापालिकेला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला, त्याच पालिकेच्या आदिवासीपाड्यात पाण्यासह स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.
उन्हाळ्यात खड्ड्यातील तर पावसाळ्यात पावसाचे पडणारे नाल्यातील दूषित पाणी पिण्याची येथील ग्रामस्थांवर वेळ आल्याने स्वच्छतेचा पुरस्कार घेणारे पालिका आयुक्त मनोहर हिरे या पाणीटंचाईकडे लक्ष देतील का, असा प्रश्न येथील आदिवासींनी केला आहे.
पाणीटंचाईसंबंधी येथील महिलांनी पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता ए.एल. गायकवाड, सहायक आयुक्त बाळाराम जाधव यांची भेट घेऊन तक्र ार केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती सुरेखा चौधरी यांनी दिली. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असेही येथील महिलांचे म्हणणे आहे. या पाड्यातील टंचाईकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करत असल्याने महिला संतापल्या आहेत. या पाड्यात पालिकेने टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाणीटंचाईमुळे खड्ड्यातील दूषित पाणी येथील नागरिकांना प्यावे लागत आहे. या पाड्यात पालिकेने बोअरवेल मारून टँकरने पाणीपुरवठा सुरू न केल्यास श्रमजीवी संघटना पालिकेवर मोर्चा काढणार आहे. - सागर देसक, अध्यक्ष, श्रमजीवी संघटना, भिवंडी शहर तालुका
या पाड्यात टंचाई आहे. ग्रामस्थांनी तक्र ारी केलेल्या आहेत. यासंबंधी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
- बळीराम जाधव,
सहायक आयुक्त