मीरा भाईंदर पालिकेच्या रस्त्यात खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:46 AM2021-09-12T04:46:36+5:302021-09-12T04:46:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून, यंदा बाप्पाचे आगमन आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले असून, यंदा बाप्पाचे आगमन आणि विसर्जन खड्ड्यांतूनच होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मीरा भाईंदरमध्ये हटकेश - मंगलनगर, डोंगरी, एमआयडीसी, आदी काही ठिकाणी तर रस्तेच खड्ड्यांत गेले आहेत अशी स्थिती आहे. बाप्पाच्या आगमनाआधी रस्त्यातील खड्डे बुजवा, असे महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बैठक घेत सांगितले होते. पण, ते सर्व केवळ कागदावरच राहिले. काही प्रमुख मार्गावर आधी केलेले पॅचवर्कसुद्धा पुन्हा उखडू लागले आहेत. यामुळे वाहनचालक पडून अपघाताच्या घटना घडतात. काशिमीरा येथे तर खड्डा चुकविताना एका तरुणाचा बळी गेला होता.
या प्रकरणी ठेकेदारासह संबंधित अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधींची सखोल चौकशी करून कारवाईची मागणी अनेकदा केली गेली आहे. पण, तांत्रिक मुद्द्यांवर तक्रारदारांची बोळवण करून प्रकरण गुंडाळली जाण्याचे प्रकार होत असतात.