घरकुलांसाठी पात्र आदिवासी लाभार्थीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 12:29 AM2020-11-24T00:29:29+5:302020-11-24T00:29:54+5:30
पंतप्रधान आवास योजना
सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यात यंदाची पंतप्रधान आवास योजनेची घरकुले अद्याप मंजूर झालेली नाहीत. मात्र, गेल्या वर्षीची म्हणजे २०१९- २० ला दोन हजार ९३ घरकुले जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, बेघर आणि मागासवर्गीय परिवारासाठी मंजूर झाले आहेत. यापैकी प्राधान्यक्रम यादीत आदिवासी (एसटी) समाजातील पात्र लाभार्थी आता शिल्लक राहिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या घरांचा लक्ष्यांक शासनास समर्पित करावा लागला आहे.
कोरोनाच्या या संकटकाळी जिल्ह्यातील मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील परिवार आदींसाठी या आर्थिक वर्षातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचा लक्ष्यांक मिळालेला नसल्याचे अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीत उघड झाले. त्याचवेळी २०१९-२० या वर्षातील दोन हजार ९३ या घरकुुलांच्या प्राप्त उद्दिष्टांंपैकी एक हजार ५९९ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचेही या बैठकीदरम्यान निदर्शनास आले. घरकुल योजनेच्या प्राप्त उद्दिष्टातील अनुसूचित जमातीच्या घरकुल मंजुरीचा लक्ष्यांक या योजनेचे पात्र लाभार्थीच जिल्ह्यात शिल्लक नसल्यामुळे शासनास समर्पित करावा लागल्याचे स्पष्ट झाले.
२५ पैकी ९ कोटींचा निधी खर्च
गेल्या वर्षाच्या या दोन हजार ९३ घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी २५ कोटी ११ लाख रुपयांचाही निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ऑगस्टपर्यंत नऊ कोटी २८ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. उर्वरित निधीतून मंजूर झालेल्या घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
या आधीचे म्हणजे २०१६-१७ ला तीन हजार ३९९ घरकुलांपैकी तीन हजार २६७ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८७ घरे रद्द करावी लागली आहेत. ४५ घरांचे काम या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.
२०१७-१८ मधील ७३५ घरांपैकी ७२० घरे बांधली आहेत. तर आठ घरे रद्द करावी लागली. सात घरांचे काम महिनाभरात पूर्ण होईल. यानंतरचे म्हणजे २०१८-१९ मध्ये ४६२ घरांना मंजुरी मिळाली असता ४३० घरे पूर्ण झाली आहेत. यातील उर्वरित घरांचे काम प्रगतीपथावर आहेत.