असंख्य कौस्तुभ व्हावेत! राणे कुटुंबाची अपेक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:46 AM2018-08-15T03:46:17+5:302018-08-15T19:58:12+5:30
कौस्तुभकडून प्रेरणा घेऊन त्याच्यासारखे असंख्य कौस्तुभ देशसेवेसाठी सैन्यात दाखल व्हावेत हीच खऱ्या अर्थाने देशाच्या या सुपुत्राला मानवंदना ठरेल.
- धीरज परब
मीरा रोड : आमचा कौस्तुभ हा देशासाठी लढताना सीमेवर एका शूरवीरासारखा शहीद झाला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे . त्याच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी आमच्या आयुष्यात निर्माण झाली, हे खरे असले तरी त्यापेक्षा कौस्तुभची प्रेरणा घेऊन त्याच्यासारखे असंख्य कौस्तुभ देशसेवेसाठी सैन्यात दाखल व्हावेत हीच खऱ्या अर्थाने देशाच्या या सुपुत्राला मानवंदना ठरेल, अशी भावना त्याच्या कुटुंबीयांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आमचा एकुलता एक मुलगा असूनही मृत्यूच्या भयाची पर्वा न करता त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे सैन्यात जाण्यास कुटुंबीयांनी नेहमीच पाठिंबा दिला. आणि कौस्तुभसुद्धा, मरण यायचेच असेल तर देशसेवा करताना सीमेवर येऊ देत, असं म्हणायचा. त्याने आयुष्यात स्वतःच्या आवडीचे करियर आणि स्वतःच्या आवडीचे वीरमरण देखील पत्करले, असे उद्गार काढताना कुटुंबीय भावूक झाले.
मंगळवार ७ ऑगस्टच्या पहाटे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सीमेवर घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. रात्री मेजर कौस्तुभ व त्यांचे तीन सहकारी जवान सीमेवर गस्त घालत असताना त्यांना आठ दहशतवादी सीमेपलीकडून देशात घुसखोरी करत असल्याचे लक्षात आले. कौस्तुभ यांनी त्याची माहिती आपल्या लष्करी तळावर दिल्यानंतर मदतीची वाट न पाहता निधड्या छातीने तिघा जवानांसह त्या ८ दहशतवाद्यांवर तुटून पडले. दोघा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले तर एक जखमी झाला. बाकीचे सैरावैरा पळू लागले. पण भयाण काळोख, दाट धुकं अशा स्थितीत देखील मदतीची वाट न पाहता पुढे सरसावलेल्या मेजर कौस्तुभसह तिघा जवानांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले. मेजर कौस्तुभ व त्यांचे कुटुंबीय हे मूळचे सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील सडुरे गावचे. पण ते मीरा रोडच्या शीतलनगरमधील हिरल सागर इमारती स्थायिक झाले. वडील प्रकाश हे दूरसंचार विभागातून निवृत्त झालेत. तर आई ज्योती ह्या मालाडच्या उत्कर्ष शाळेतून शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. धाकटी बहीण कश्यपी शिकतेय.
कनिकासोबतच्या लग्नाला अजून ५ वर्षं देखील झाली नाहीत. तर अवघ्या दोन वर्षांच्या निरागस अगस्त्यला तर आपले पितृछत्र हरपले याचा गंधसुद्धा नाही. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या या सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी मीरा रोडमध्ये उत्स्फूर्त असा जनसागरच उसळला होता. देशाच्या सुपुत्राला अभिवादन करण्यासाठी व कौस्तुभसारखा हिरा ज्यांच्या पोटी जन्मला त्या त्याच्या आई-वडिलांना मनाचा मुजरा करण्यासाठी व त्या वीर पत्नीला अभिवादन करण्यासाठी आजही कुठून कुठून सर्वसामान्य लोक त्यांच्या निवासस्थानी गर्दी करत आहेत. मनात हळहळ असली तरी या कुटुंबीयांना भेटून सर्वसामान्यांचा ऊर अभिमानाने भरून येतोय.
कौस्तुभच्या आई ज्योती यांना सुरुवातीपासूनच सैन्याबद्दल आपुलकी होती. कोणत्या तरी निमित्ताने सैन्यासोबत काम करायला मिळावे, अशी त्यांची सुप्त इच्छा होती. आईने कधी जाहीर न केलेली ती सुप्त इच्छा कौस्तुभने पूर्ण केली. अवघ्या ६-७ वर्षांचा असताना कौस्तुभला मरिन लाइन्स येथे नौदलाच्या परेडसाठी त्याच्या आई-वडिलांनी नेले होते. कदाचित त्याच वेळी सैन्यात जायचे मनात स्फुलिंग पेटले. ७ वी पूर्ण झाल्यावर त्याने रायगड सैनिकी शाळेतून १ महिन्याचे प्रशिक्षण मोठ्या जिद्दीने पूर्ण केले. मीरा रोड परिसरातच बालपण गेले. शालेय शिक्षण होलिक्रॉस शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण रॉयल महाविद्यालय व शैलेंद्रमध्ये झाले. ११ वी पासून तर त्याला सैन्यात जायचे वेधच लागले.
पुण्याला शिक्षणासाठी गेला तेव्हा दुचाकी वापरणे बंद करून त्याने सायकल चालवण्यास सुरुवात केली. सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढतो व व्यायाम पण होतो म्हणून तरुणांना आकर्षण असलेली दुचाकी त्याने सहज बाजूला ठेवली. पोहणे शिकला, तो खूप वाचन करायचा. जगाचा इतिहास कळेल असं वाचन व युद्धपट तो पाहायचा. तरुण उमलत्या वयात देखील तो प्रवाहासोबत वाहत गेला नाही. त्याला कुठे थांबायचं हे माहीत होतं. तसंच प्रवाहाविरोधात पोहण्याची जिद्द व धाडस देखील त्याच्यामध्ये होतं. त्याने आपल्या वडिलांकडे एक वर्ष मागितलं होतं. जर काही करून दाखवू शकलो नाही, तर तुम्ही जे सांगाल तसं करेन, असा शब्द त्याने दिला होता.
पण सैन्यात निवडीसाठी भोपाळ येथे झालेल्या मुलाखतीत १४० परीक्षार्थींपैकी निवडलेल्या ६ जणांमध्ये कौस्तुभसुद्धा होता. कंबाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर चेन्नई येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २०११ मध्ये सैन्यात लेफ्टनंट पदावर नियुक्त झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर २०१८ मध्ये मेजरपदी बढती मिळाली. वयाच्या अवघ्या २९ व्या वयात व सैन्यदलातील अवघ्या सात वर्षांच्या सेवेत कौस्तुभची ही मेजर पदपर्यंतची भरारी कौतुकास्पदच होती. धाडसी आणि साहसी असलेला कौस्तुभ सैन्यातील अवघ्या ७ वर्षांच्या कार्यकाळात साडेचार वर्ष तर सतत सीमेवर किंवा लष्करी ऑपरेशनमध्येच रमला. त्याला कार्यालयात काम करण्यापेक्षा रणांगणात शत्रूंशी दोन हात करण्यातच आवडायचे. हिमस्खलन झाले तेव्हा लष्कराने राबवलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये देखील कौस्तुभ सहभागी झाला होता. ३ जवानांना रेस्क्यू करण्यात आले होते. केरन सेक्टर असो वा गेल्या जुलैला राबवलेले लष्करी ऑपरेशन असो. लष्करी ऑपरेशनमध्ये तो नेहमी पुढे असायचा. उमदा, धाडसी, मनमिळवू स्वाभावाचा पण ध्येयवादी असलेला कौस्तुभ लष्करात देखील सर्वांचा लाडका बनला होता. घरात सुद्धा तो सर्वांचा लाडका होता. सैन्यात दाखल होण्याआधीचा कौस्तुभ आणि नंतरचा कौस्तुभ खूप वेगळा होता. पूर्वी तो कुटुंबीयांचं ऐकायचा. पण लष्करात भरती झाल्यावर तो कुटुंबीयांचा मार्गदर्शक बनला होता. देशासाठी सैन्यात जायचं हे त्याचं पहिल्यापासूनच ध्येय होत आणि आई-वडिलांनी तसेच कुटुंबीयांनी देखील त्याला अडवलं नाही. त्याच्या प्रत्येक निर्णयाला घरच्यांनी साथ दिली.
२६ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला सेना पदक मिळाले. ही त्याच्या देशसेवेची मिळालेली मोलाची पोचपावती होती. देशासाठी काही तरी करायचं ही त्याची नेहमी जिद्द होती. मरण यायचं असेल तर ते सीमेवर येऊ दे, असं तो नेहमी बोलून दाखवायचा. देशासाठी अजून खूप काही करायचं होतं त्याला.
आमचा कौस्तुभ कुठे हि गेलेला नाही ... तो कुठे तरी सीमेवर देशाच्या संरक्षणा साठी गुंतलेला आहे .... करेल फोन तो ... आम्ही पण त्याच्या फोन ची वाट पाहतोय .... पण सणवार असला कि त्याची आठवण येणारच असं सांगताना कुटुंबीय भावूक झाले . असा पण कौस्तुभ यायचा तोच आमच्या साठी सण असायचा .
लष्करी मोहीम फत्ते करून मुलाला वाढदिवसाचं गिफ्ट
२४ जुलैला अगस्त्यचा वाढदिवस . अधिकाऱ्यांनी त्याला ७ दिवसांची सुट्टी घेऊन मुलाच्या वाढदिवसाला घरी जा असं सांगतिलं होतं . पण २८ जुलैचं लष्करी ऑपरेशन त्याने आपल्या चिमुरड्याच्या वाढदिवसा पेक्षा महत्वाचं मानलं . लष्करी ऑपरेशन फत्ते केल्यावर तो आपली पत्नी व आई वडिलांना मोठ्या अभिमानाने म्हणाला होता कि , अगस्त्याला त्याच्या दर वाढदिवसाला असंच काही तरी गिफ्ट देईन म्हणून . अगस्त्याचा पुढचा तिसरा वाढदिवस आणि त्याच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस तरी तो अगस्त्य व कुटुंबियां सोबत साजरा करेल अशी आशा घरच्यांना होती. त्याची अगस्त्य साठी खूप स्वप्नं होती. पण यंदाचं त्याने अगस्त्य साठीचं दिलेलं हौतात्म्याचं गिफ्ट खरंच खूप मोठं ठरलं .