महापालिका हद्दीत अद्यापही ८३२ बेड शिल्लक, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची कमतरता भासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 05:24 PM2020-05-19T17:24:40+5:302020-05-19T17:25:20+5:30
महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामानाने सध्या विविध रुग्णालयात बेड पुरेसे असले तरी वाढणारी कोरोना बाधीतांची संख्या ही चिंताजनक आहे, त्यामुळे भविष्यात हे बेडही अपुरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता शहरातील हॉस्पीटल देखील कमी पडू लागली आहेत. रोजच्या रोज ८० ते ९० रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे आता या रुग्णांसाठी १ हजार खाटांचे हॉस्पीटल प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे या रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी पालिकेने आता भार्इंदरपाडा येथील क्वॉरन्टाइनसाठी असलेल्या एका केंद्रात, खाजगी शाळेत, दोन हॉटेल आदींची देखील व्यवस्था केली आहे. त्यानुसार या ठिकाणी आजच्या घडीला प्रत्यक्ष उपचार घेतलेले रुग्ण ९०६ रुग्णांव्यतीरीक्त ८३२ बेड शिल्लक असल्याची माहिती पालिकेने दिली परंतु दिवसागणिक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात हे बेडही कमी पडतील असे चित्र सध्या दिसत आहे.
ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढतांना दिसत आहे. शहरात आजच्या घडीला १८ मे पर्यंत १२६९ रुग्ण असले तरी त्यातील ३१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ५० रुग्णांची मृत्यु झाला आहे. त्यामुळे आजच्या घडीला ९०६ रुग्ण हे विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. परंतु दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या लक्षात घेता, महापालिका हद्दीत आणखी हॉस्पीटल पालिकेला आरक्षित करावी लागणार आहेत. तिकडे ग्लोबल हब सेंटरमध्ये १ हजार खाटांचे रुग्णांलयाचे काम सुरु आहे. तर शहरातील ५ खाजगी रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय येथे ५२९ बेडची क्षमता असून त्याठिकाणी आजच्या घडीला ४६० रुग्ण उपचार घेत आहेत. तर ६९ बेड शिल्लक आहेत. दुसरीकडे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने आणखी एक खाजगी रुग्णालय आरक्षित केले आहे. तसेच दोन हॉटेल आणि भार्इंदर पाडा येथील क्वॉरन्टाइन केलेल्या इमारतीमधील बी आणि डी वींग तसेच एक खाजगी शाळाही आरक्षित केली आहे. या हॉटेल, क्वॉरन्टाइनच्या इमारतींमध्ये आणि खाजगी शाळेत कोणतेही लक्षणे नसलेल्या मात्र त्याला कोरोनाची लागण झाली असेल अशा रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या ठिकाणांची १३३२ बेडची कॅपीसीटी असून येथे आतापर्यंत ५३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७६३ बेड आजच्या घडीला शिल्लक असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
एकीकडे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे भार्इंदर पाडा येथील क्वॉरान्टाइन करण्यात आलेल्या सी विंगमध्ये ७१६ ची कॅपीसीटी असतांना तिथे ८४३ जणांना ठेवण्यात आले आहे. तर कासारवडवली येथे १०६ ची कॅपीसीटी असतांना तेथे ३८ जणांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ६८ रुम शिल्लक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.