'ई-पास’साठी कारणे दोनच; रुग्णालय किंवा अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:22 PM2021-05-07T23:22:24+5:302021-05-07T23:23:15+5:30
चार हजार ५६१ प्रवाशांना प्रवासाची मुभा : २३ हजार २७८ अर्ज नामंजूर
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत कडक लॉकडाऊन केला. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासासाठी पोलिसांचा ई-पास आवश्यक केला आहे. अत्यावश्यक कारणांसाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना पोलिसांकडून हा ई-पास दिला जाणार असून आतापर्यंत १२ दिवसांमध्ये चार हजार ५६१ प्रवाशांनी हा पास घेतल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांनी दिली.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने अलीकडेच आंतरजिल्हा जाण्यासाठी निर्बंध आणले आहेत. २१ एप्रिल २०२१ रोजीच्या आदेशानुसार २३ एप्रिलपासून ई-पास सेवा सुरू केली आहे. त्यानुसार ४ मेपर्यंत संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २७ हजार ९९६ अर्ज आले. यामध्ये ठाणे- दहा हजार ५५३, भिवंडी- एक हजार ४५०, कल्याण- नऊ हजार ९५३ आणि उल्हासनगर परिमंडळातील सहा हजार ४० अर्जांचा समावेश आहे.
यात अनावश्यक २३ हजार २७८ अर्ज नामंजूर झाले. तर चार हजार ५६१ अर्ज मंजूर झाले. यामध्ये ठाणे- दोन हजार २१८, भिवंडी- २४६, कल्याण- एक हजार ३३० आणि उल्हासनगर परिमंडळातून ७६७ प्रवाशांना मुभा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कागदपत्रे हवीत
ऑनलाइन अर्ज करताना जर अंत्यसंस्कारासाठी जात असाल तर शक्य असल्यास मृत्यूचा दाखला किंवा इतर कागदपत्रे, विवाहसमारंभासाठी लग्नपत्रिका त्याचबरोबर रुग्णालयीन कारणासाठी आणि एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास तशी कागदपत्रे जवळ बाळगावी आणि ऑनलाइन अर्जामध्ये जोडावीत. ई-पास मंजूर झाल्यास त्याची सॉफ्ट कॉपी, स्वत:चे ओळखपत्र आणि आधार कार्ड आदी कागदपत्रेही जवळ बाळगावीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ई-पाससाठी असा करावा अर्ज
nई-पाससाठी संबंधितांनी पोलिसांकडे ( https://covid19.mhpolice.in/) ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अत्यावश्यक प्रवासासाठी खासगी व्यक्तींना
या प्रवासाची अनुमती दिली जात आहे.
nअर्ज केल्यानंतर संबंधितांना अर्जावर टोकन क्रमांक दिला जातो. त्यानंतर पोलीस उपायुक्त किंवा अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर हा अर्ज मंजूर केला जातो. यात कारण अयोग्य असल्यास तो नामंजूर केला जातो, अशी माहिती शहर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.
अवघ्या २४ तासांमध्ये
मिळते ई-पासला मंजुरी
बाहेरील जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित पोलीस अधीक्षक यांच्याकडून मान्यता मिळाल्यानंतर साधारण २४ तासांमध्ये अर्ज मंजूर केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा तसेच शासकीय सेवा त्याचबरोबर वैद्यकीय सेवांशी संबंधितांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास करता येतो. जर बाहेर जिल्ह्यात जायचे असेल तर त्यांनाही अशा ई-पासची गरज लागणार आहे.
कारणे तीच
ई-पाससाठी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाइकाचा अथवा ओळखीच्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण दिले जाते. त्याचबरोबर विवाह समारंभ, वैद्यकीय सेवा, रुग्णालय आणि मजुरांच्या स्थलांतरासाठीची कारणे किंवा नळ दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिक कामासाठीही बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मागितली जाते.