एअर फोर्सच्या तळाजवळ इमारत परवानगीसाठी महापालिकेवर मोठ्या असामीचा दबाव आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:29 PM2020-09-27T23:29:40+5:302020-09-27T23:35:03+5:30
‘कोरोना’च्या आपत्तीचे संकट असतानाच ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रमित करणारा असल्याचे मत भाजपाचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे.
ठाणे: ‘कोरोना’च्या आपत्तीचे संकट असतानाच ठाण्यातील कोलशेत येथील हवाई दलाच्या तळापासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना बंदीचा महापालिकेचा आदेश संभ्रमित करणारा असल्याचे मत भाजपाचे जेष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर हवाई दलाच्या तळाजवळ इमारतींच्या परवानगीसाठी महापालिकेवर एखाद्या मोठया असामीचा दबाव आहे का? असा सवालही पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
आपल्या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, यापूर्वीही कोलशेत हवाई दलाच्या तळाजवळ बांधकामांना परवानगी दिली जात नव्हती. मात्र, काही वर्षांपूर्वी अचानक हवाई दलातील अधिकाऱ्यांच्या एनओसीद्वारे (ना हरकत प्रमाणपत्र) महापालिकेच्या शहर विकास विभागाची परवानगी मिळवून काही बिल्डरांनी उत्तूंग इमारतीही बिनधिक्कतपणे उभारल्या. सध्या या इमारतींमध्ये रहिवाशीही वास्तव्याला आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नव्याने काढलेल्या आदेशामुळे अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
संरक्षण मंत्रालयाकडून हवाई दलाच्या तळांविषयीची नियमावली निश्चित केली जाते. कोलशेत येथील अनेक इमारतींना हवाई दलाने दिलेली ‘एनओसी’ ही अधिकृत आहे का, शहर विकास विभागाने संबंधित एनओसीची हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली होती का, संबंधित एनओसी मिळविणारे बिल्डर तसेच प्रमाणपत्र देणारे अधिकारी आदींबाबत चौकशीची गरज आहे. एकिकडे उत्तूंग इमारतींना एनओसी देणारे हवाई दलातील अधिकारी कोलशेत येथील भूमिपूत्रांच्या एकमजली घरांच्या
दुरु स्तीलाही मज्जाव करतात. ही बाब आश्चर्यकारक असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
हवाई दलातील अधिकाºयांनी १४ मार्च २०१७ रोजी महापालिकेला पत्र पाठविले होते. मात्र, आता कोरोनाचे आव्हान असताना तब्बल साडेतीन वर्षानंतर काढलेला आदेश संभ्रमात टाकणारा आहे. हवाई दलाच्या तळाजवळ मोेठया बिल्डरांच्या संकूलाला परवानगी देण्यासाठी महापालिका प्रशासनावर कोणी मोठी व्यक्ती दबाव आणत आहे का, या दबावामुळे नव्याने आदेश काढून महापालिका अधिकारी पळवाट काढत आहेत का, नव्या आदेशापूर्वी झालेल्या इमारतींबाबत प्रशासनाची भूमिका कोणती आहे, तळाजवळच्या इमारतींना मंजूरी देणारे शहर विकास विभागातील तत्कालीन अधिकारी व तत्कालीन महापालिका आयुक्तांची नावे जाहीर करणार का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नव्या बांधकामांना बंदी घालण्याच्या आदेशाबाबत सविस्तर माहिती द्यावी. तसेच भूमिपूत्रांच्या घरांबाबत हवाई दलाच्या अधिकाºयांच्या समन्वयाने निश्चित धोरण तयार करावे. आतापर्यंत हवाई दलाने दिलेली एनओसी आणि त्या एनओसीच्या आधारावर विकास प्रस्तावाला मान्यता देणाºया अधिकाºयांची चौकशी करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे.
कोलशेतच्या समस्येकडे वेधले संरक्षणमंत्र्यांचे लक्ष
हवाई दलाच्या निर्बंधांमुळे कोलशेत येथील ग्रामस्थांच्या समस्येकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे लक्ष वेधले आहे. देशासाठी जमीन देणाºया भूमिपूत्रांना नवे घर आणि घरदुरु स्ती करण्यासाठी परवानगी द्यावी. तसेच हवाई तळाच्या १०० मीटर परिसरात बहूमजली इमारतींना एनओसी देणाºया अधिकाºयांच्या चौकशीची मागणीही पवार यांनी संरक्षण मंत्र्यांकडे केली आहे.
——-