दोन बायकांच्या दादल्याने ‘तिसरी’साठी केले मुलाचे अपहरण; पोलिसांनी लढवली शक्कल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:00 PM2023-01-11T12:00:13+5:302023-01-11T12:00:45+5:30
बारा तासांत पोलिसांनी लावला छडा; दोघांनी गायलेली गाणी यू-ट्युबवर केली अपलोड
तलासरी : आधीच दोन बायकांचा दादला असलेल्याने तिसऱ्या प्रेयसीने आपल्याकडे यावे यासाठी तिच्या बहिणीच्या आठ वर्षांच्या मुलाचे शाळेतून अपहरण केल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याने मुलाचे अपहरण केले. तलासरी पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवून बारा तासांच्या आत आरोपीला अटक करून अपहृत बालकाची सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले.
दोन बायका असलेला विवाहित तरुण राजेश बारक्या धोदडे (रा. वेलूगाव, दादरा नगर हवेली, सध्या रा. कवाडा, ठाकरपाडा) याचे आणवीर येथील आणखी एका तरुणीशी सूत जुळले. चार वर्षांपासून त्यांचे प्रेम प्रकरण सुरू असून, त्यांनी यू-ट्यूबवर देखील गाणी गाऊन अपलोड केली आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून प्रेमिका सरिताने लग्नाचा हट्ट धरल्याने त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे सरिताने त्याच्याकडे पैशांची भरपाई मागितली.
याचा राग मनात धरून राजेशने सरिताची बहीण अनिता हिचा मुलगा कमलेश (वय ८ वर्षे) हा सोमवारी सकाळी जिल्हा परिषद शाळा आणवीर, रायातपाडा येथील शाळेत गेला असताना आरोपीने शाळेत जाऊन तुला मावशी सरिताने बोलाविले आहे, असे सांगून त्याला गाडीतून पळवून नेले. त्याने त्याला दादरा नगर हवेलीतील शेलटी गावातील जंगलात लपवून ठेवले व प्रेयसीला फोन करून तू मला भेटलीस तर मुलाला सोडून देईन, असे सांगून तिला एकटीच मनोर येथे येण्यास सांगितले.
दबा धरून केले जेरबंद
आरोपी राजेश हा फोन करताना प्रत्येक वेळी मोबाइलचे सीम बदलत होता. लोकेशननुसार आरोपीची गाडी पोलिसांच्या खासगी गाडीच्या मागेच असल्याने सावज पकडण्यासाठी तरुणीला चारोटीजवळ महामार्गांवर सोडले व पोलिस दबा धरून बसले. यावेळी राजेशने प्रेयसीला बघून गाडी थांबवून तिला गाडीत ओढत असतानाच पोलिसांनी राजेशला पकडले.
मोबाइल लोकेशनवरून आरोपी गजाआड
तलासरी पोलिसांनी दोन पथके तयार करून मोबाइल लोकेशन काढून चारोटी येथे प्रेयसीच्या मागावर आलेल्या राजेशला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मुलाची माहिती घेऊन अपहरण झालेल्या कमलेशला सोमवारी रात्री आठच्या दरम्यान सोडवून आईच्या ताब्यात दिले. ही कारवाई तलासरीचे पोलिस निरीक्षक अजय वसावे, पोलिस उपनिरीक्षक उमेश रोठे, उपनिरीक्षक गायकवाड तसेच तलासरी पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी पार पाडली.