फेरीवाला असून अडचण, नसून खोळंबा
By admin | Published: November 14, 2015 11:38 PM2015-11-14T23:38:53+5:302015-11-14T23:38:53+5:30
ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवरील जागा फेरीवाल्यांनी अडवल्या असून लोकांना चालण्याकरिता जागा शिल्लक नाही.
ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवरील जागा फेरीवाल्यांनी अडवल्या असून लोकांना चालण्याकरिता जागा शिल्लक नाही. फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणारे दादा, पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्या संगनमताने हे अतिक्रमण होत असून फेरीचा व्यवसाय करण्याकरिता दिल्या जाणाऱ्या जागांचे दर लाखांच्या घरात पोहोचले आहेत. मात्र केवळ फेरीवाले व त्यांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेला दोषी धरून चालणार नाही. रेल्वे स्थानकाच्या परिसरात किंवा अगदी रेल्वेच्या पुलावर वस्तूंची खरेदी करण्याकडे लोकांचाही ओढा असल्याने नागरिकही या समस्येला तेवढेच कारणीभूत आहेत. परिणामी महापालिकांनी बांधलेल्या मंडया ओस पडल्या आहेत. बृहन्मुंबई महापालिकेला ज्या समस्येवर रामबाण उपाय शोधता आला नाही त्यावर अन्य छोट्या महापालिकांनी डोळ््यावर कातडे ओढून बसणेच पसंत केले आहे. प्रत्येक वेळी घोषणा होतात, समित्या स्थापन होतात परंतु, प्रत्यक्षात कारवाई काहीच होत नाही. याचे कारण या प्रश्नात गुंतलेले आर्थिक आणि अन्य हितसंबंध हे आहे. जोपर्यंत त्याचा नायनाट होत नाही तोपर्यंत ही स्थिती अशीच कायम राहणार अशी चिन्हे दिसत होती. ही स्थिती बदलण्यासाठी नगरविकास विभागाचे उपसचिव एस.एस. गोखले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीत भिवंडी महापालिका आयुक्त, मुंबई महापालिकेचे उपायुक्त बी.जी. पवार, पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप, नागपूर महापालिका उपायुक्त संजय काकडे यांचा समावेश असून नगर विकास विभागाचे अवर सचिव सुधाकर बोबडे हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. येत्या ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत या समितीने या फेरीवाला धोरणाचा अंतिम मसुदा शासनास सादर करावयाचा आहे. त्याचा आढावा घेणारा वृत्तांत...
दीड वर्षे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी नाही
मागील महिन्यात ठाणे महापालिका आयुक्तांनी रस्ता आणि फुटपाथ अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. परंतुु, ठाण्याला त्यांची समस्या आजची नाही. गेल्या कित्येक वर्षापासून शहराला त्यांचा विळखा आहे. त्यांना हक्काची जागा मिळावी म्हणून फेरीवाला धोरण अंमलात येण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, चार वर्षे उलटूनही ते कागदारवरच आहे. विशेष म्हणजे, त्याच्या नावाखाली शहरात फेरीवाल्यांची संख्या ही पूर्वीपेक्षा वाढल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर कितीही कारवाई केली तरी ही समस्या फेरीवाला धोरण जोपर्यंत अंमलात येत नाही, तोपर्यंत सुटणार नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख ही आता फेरीवाल्यांचे शहर म्हणूनही झाली आहे. शहरातील स्टेशन परिसर असो अथवा घोडबंदरच्या ब्रीज खालील मोकळी जागा, फुटपाथ असो अथवा रस्ता अथवा चौक़ आज प्रत्येक ठिकाणी त्यांनी ठाण मांडले आहे. पूर्वी शहरात पाच ते सात हजारांच्या आसपासच त्यांची संख्या होती. परंतु, आज एखादा नवा परिसर विकसित झाला की त्या ठिकाणी ते बस्तान मांडत आहेत. किंबहुना आता स्टेशन परिसर, नौपाडा, राम मारुती रोड, गोखले रोड या ठिकाणी तर तेथील अनेक दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील जागा फेरीवाल्यांना भाड्याने दिली आहे. त्यातही या व्यवसायातही गुडांची ताकद वाढू लागल्याने फेरीवाल्यांचे प्रस्थ आणखीनच वाढले आ
नोंदणी केली मग
कारवाई कशाला...
पालिकेकडे शहरातील काही फेरीवाल्यांनी अर्ज दिले आहेत, परंतु तरीदेखील अतिक्रमण विरोधी पथकाकडून त्यांच्यांवर कारवाई केली जात आहे. आम्ही रोज पालिकेला २० रुपये देतो, पालिका त्याची पावतीही देते. मग कारवाई कशाला? असा सवाल फेरीवाल्यांनी केला आहे.
त्या तीन मार्केटमध्ये फेरीवाले केव्हा बसणार...
फेरीवाल्यांची वाढती संख्या लक्षात घेता, त्यांना हक्काचे ठिकाण मिळावे म्हणून पालिकेने घोडबंदर येथील खेवरा सर्कल, हाजुरी मार्केट आणि उथळसर भागात जोगीला मार्केट तसेच स्टेशनच्या बाजारपेठ परिसरात महात्मा फुले मंडई बांधली आहे. परंतु, आजही त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन झालेले नाही.
स्टेशन परिसरात असलेल्या मंडईत खालच्या मजल्यावर मच्छी मार्केट आहे. परंतु, वरचे मजले धूळ खात पडले आहेत. खेवरा सर्कलच्या मंडईचा आरंभ निवडणुकीच्या धामधुमीत केला होता. परंतु चार वर्षे उलटूनही ही मंडई धूळ खात पडून आहेत. जोगीला मार्केट आणि हाजुरी मार्केटही फेरीवाल्यांच्या प्रतिक्षेत आहे.
अंबरनाथ-बदलापुरातील रस्ते फेरीवाल्यांच्या ताब्यात
अबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरात फेरीवाला क्षेत्र जाहीर न झाल्याने शेकडो फेरीवाले रस्त्याला विळखा घालून आपला व्यवसाय करीत आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. त्यांचा उपद्रव सर्वज्ञात असतांनाही दोन्ही पालिकांनी अद्याप फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही.
अंबरनाथ रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना सर्वप्रथम दर्शन घडते ते फेरीवाल्यांचे. पूर्व आणि पश्चिम भागात त्यांच्या विळख्यातून वाट काढून प्रवाशांना आॅटोरिक्षा स्टॅड पर्यंत पोहचावे लागते. अंबरनाथसाठी स्वतंत्र भाजी मंडई आहे. त्या मंडईतील ओटले भाडेतत्वावर दिले आहेत. मात्र येथे रितसर व्यवसाय न करता सर्वच भाजी विक्रेते रस्त्यावर व्यवसाय करताना दिसतात. मंडईतील काँक्रीट रस्त्यांचा ताबा त्यांनी घेतला आहे. त्यांचा विस्तार येवढा वाढला आहे की या रस्त्यावरुन साधी दुचाकीही जाणे शक्य नाही. हीच परिस्थिती पश्चिम भागातील रेल्वे पुलाच्या उतारावर आहे. येथेही त्यांच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. वाहनचालकांना त्रास होऊ नये यासाठी तयार केलेला काँक्रीट रस्ता त्यांनी व्यापला आहे. यामुळे वाहनचालकांना खड्डे पडलेल्या डांबरी रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. पूर्व भागात देखील हीच परिस्थिती असून रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला त्यांचा विळखा आहे. शिवाजी चौक हे अंबरनाथ शहराचे नाक समजले जात असले तरी हा चौकदेखील चारही बाजूने त्यांनी व्यापलेला आहे. शिवाजी चौक ते वडवली वेल्फेअर सेंटर आणि शिवाजी चौक ते बी केबीन रोड हे दोन्ही रस्ते त्यांच्या अतिक्रमणामुळे गिळंकृत झाले आहेत. अंबरनाथ शहरातील फेरीवाल्यांची गणना पालिकेने अद्याप केलेली नाही. मात्र शहरात एकूण फेरीवाल्यांचा विचार केल्यास हा आकडा ८०० च्या वर जातो. या सर्वांना फेरीवाला क्षेत्रात जागा देणे शक्य नाही. त्यातच असे अनेक फेरीवाले आहेत की त्यांनी शहरातील अनेकांनी मोक्याची तीन ते चार जागा आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. सोबत अनेक गावगुंड हे स्टेशन परिसरातील जागेवर आपला ताबा दाखवून ती जागाभडेतत्त्वावर इतरांना उपलब्ध करुन देत आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई करण्यात अंबरनाथ पालिका नेहमीच कुचकामी ठरली आहे.
बदलापुरातही तीच परिस्थितीदुसरीकडे बदलापुरातही पालिकेने अधिकृत असे फे रीवाला क्षेत्र घोषित केलेले नाही. पश्चिम भागातील मुख्य बाजारपेठेतला रस्ता हा आधीच अरुंद असतांना या मुख्य रस्त्यावर फेरीवाल्याचा विळखा आहे. फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने ते जागेचे मालक असल्याचा आव आणत आहे. बदलापूर शहरात आजच्या घडीला ६०० हून अधिक फेरीवाल्यांची संख्या असून त्यांना फेरीवाला क्षेत्रात जागा उपलब्ध करुन देणे अवघड जाणार आहे. त्यातच बदलापूर पालिकेने नव्याने उभारलेले भाजी मंडई , फळ विक्री केंद्र आणि मच्छिमार्केट यांचा वापर सुरु केलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील याच फेरीवाल्यांवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. बदलापूर रेल्वे फाटकात तर फेरीवाल्यांची दादागिरी दिसून येते. त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासावर अद्याप कोणताच तोडगा काढलेला नाही. स्टेशनकडे येणारे सर्व रस्ते त्यांनी व्यापल्याने त्याचा त्रास वाहतूक व्यवस्थेवर आणि पादचाऱ्यांना सहन करावे लागत आहे. ं