ठाणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ
By admin | Published: January 10, 2017 06:24 AM2017-01-10T06:24:10+5:302017-01-10T06:24:10+5:30
राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत
ठाणे : राज्यातील मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ठाणे जिल्हा अव्वल आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५६ लाख दोन हजार ६३९ मतदारसंख्येत दोन लाख १२ हजार ३० मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे आता ठाणे जिल्ह्यात ५८ लाख १४ हजार ६६९ मतदार असून राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत मतदारसंख्येतील ३.७८ टक्के ही वाढ सर्वाधिक असल्याचे येथील उपजिल्हाधिकारी फारोग मुकादम यांनी सांगितले. यात निवडणूक होऊ घातलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात ७९ हजार १२९, तर उल्हासनगर महापालिका क्षेत्रात १३ हजार ६५२ मतदार वाढले आहेत.
राज्यातील ही मतदारसंख्येतील वाढ वाखाणण्याजोगी आहे. मयत झालेले, पत्त्यावर नसलेले, स्थलांतर झालेले आदी पाच लाख ५२ हजार मतदार मागील दोन वर्षांच्या कालावधीत कमी करूनही ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत ५८ लाख १४ हजार मतदार आहेत. यात ३१ लाख ८५ हजार ६२६ पुरुष तर २६ लाख २८ हजार ७८३ पहिला मतदार असून २६० इतर मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी ठाणे शहरात पाच पूर्ण मतदारसंघ असून ओवळा-माजिवडा या मतदारसंघाचा काही भाग ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. यामुळे या पाच मतदारसंघांत ७९ हजार १२९ मतदारसंख्या वाढलेली आहे. शहरीकरणामुळे या मतदारसंख्येत वाढ झालेली असून ओवळा-माजिवडा मतदारसंघात ७.२४ टक्के मतदारसंख्या वाढलेली आहे. कोपरी-पाचपाखाडीत ४.८९ टक्के, ठाणे ४.५१ टक्के, मुंब्रा कळवा ६.८० टक्के, ऐरोली ०.४१ आणि बेलापूर ०.८३ टक्के मतदार वाढले आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मात्र चार हजार ६९८ मतदार कमी झाले आहेत. सुमारे १.१७ टक्के मतदार या मतदारसंघाचे कमी झालेले असून त्यात सध्या तीन लाख ९८ हजार ३७२ मतदार आहेत. याउलट, भिवंडी ईस्टमध्ये १० टक्के मतदार वाढलेले असून भिवंडी वेस्टमध्येदेखील ८.४० टक्के मतदारसंख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. याप्रमाणेच निवडणूक होऊ घातलेल्या उल्हासनगर मतदारसंघातदेखील ५.४८ टक्के मतदारसंख्या वाढलेली असून दोन लाख ६२ हजार ८३७ मतदार या महापालिका क्षेत्रात आहे. एक वर्षाच्या कालावधीत नवीन मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. यामुळे मतदार संख्येतील कमीअधिक फरक दिसून येत आहे. मतदारयादीतील नावे कमी करण्यापूर्वी संबंधित महापालिकेच्या स्थायी समितीमध्येदेखील ठराव घेतला जातो. ठिकठिकाणी जनजागृतीही केली जात असल्याचे मुकादम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)