मतदारसंघ कोणाच्या ताब्यात जाणार पत्ता नाही; पण, भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच!
By अजित मांडके | Published: April 13, 2024 05:57 PM2024-04-13T17:57:13+5:302024-04-13T17:57:37+5:30
केळकरांनी निर्माण केले स्वकीयांनाच आव्हान.
ठाणे : ठाणे लोकसभेतून महायुतीचा उमेदवार कोण असेल यावरुन अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही. परंतु दुसरीकडे शिंदेसेना आणि भाजपमधून अनेक इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. त्यात भाजपकडून संजीव नाईक यांनी उमेदवारी जाहीर नसतांनाही प्रचाराला सुरवात केली असतांनाच आता ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मला उमेदवारी मिळाल्यास मी लढण्यास तयार असल्याचे सुतोवाच करीत शिवसेनेला आव्हान देतांनाच आपल्याच पक्षातील स्वयकींना आव्हान देत डिवचण्याचे काम केल्याने आता उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी तो आता ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. हा बालेकिल्ला का हवा त्यासाठीचे दाखले देखील भाजपकडून दिले जात आहेत. परंतु अद्यापही हा मतदार संघ कोणाच्या पारड्यात जाणार याचे चित्र स्पष्ट नाही. असे असले तरी स्थानिक पातळीवर आता शिंदे सेना आणि भाजपकडून मेळावे घेण्यास सुरवात झाली आहे. कधी महायुतीच्या माध्यमातून तर कधी पक्षनिहाय मेळावे घेतले जात आहेत. शिंदे सेनेकडून आजही प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. तर मेळाव्याच्या माध्यमातून हे चौघेही जनतेच्या समोर जात आहेत. शिवाय आमच्यातील कोणालाही उमेदवारी मिळाली तरी देखील आम्ही त्याचे काम करण्यास तयार असल्याचे ते जाहीरपणे सांगत आहेत. किंबहुना एकमेकांना आव्हान निर्माण करतांना कुठेही दिसून येत नाहीत. त्यातही आमचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत, महायुतीच्या उमेदवाराला आम्हाला निवडून आणायचे आहे, अशा आणा भाकाही दिल्या जात आहेत.
तिकडे भाजपने दावा करुन शिंदे सेनेचा त्रास वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अद्यापही हा मतदार संघ कोणाच्या ताब्यात जाईल याचे चित्र स्पष्ट होत नाही. परंतु भाजपमधून देखील विनय सहस्त्रबुध्दे, संजीव नाईक यांच्या नावे आघाडीवर आहेत. त्यांनी देखील वयक्तीक पातळीवर प्रचार सुरु केला आहे. संजीव नाईक यांनी तर थेट मिराभार्इंदर, नवीमुंबई भागात जाऊन आपणच उमेदवार असल्याचे जवळ जवळ जाहीर करीत शिवसेनेला आव्हान उभे केले आहे.
असे असतांनाच आता चर्चेत नसलेले परंतु ठाण्यात शिंदे सेनेला सतत अंगावर घेणाºया भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी आता मी सुध्दा रेसमध्ये असल्याचे सुतोवाच केले आहे. पक्षाने संधी दिली तर मी सुध्दा लढण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे केळकर यांनी शिंदेसेनेला आव्हान तर दिले आहेच, शिवाय या मतदार संघावर भाजपचा दावा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु असे असले तरी देखील शिवसेनेसोबतच त्यांनी आपल्याच पक्षातील संजीव नाईक आणि विनय सहस्त्रबुध्दे यांना देखील एक प्रकारे डिवचल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वयीकांपुढेच त्यांनी आता आव्हान उभे करुन त्यांनी उलट सुलट चर्चांना दारे मोकळी करुन दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आता भाजपमध्ये आपसातच आता तिकीटासाठी रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा राजकीय वुर्तळात सुरु झाली आहे.