जागेचा निर्णय होत नाही तोपर्यंत दावा करणे काही गैर नाही - केशव उपाध्ये
By अजित मांडके | Published: May 1, 2024 04:48 PM2024-05-01T16:48:19+5:302024-05-01T16:49:20+5:30
ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरला असला तरी आमचे उमेदवार नरेंद्र मोदी असल्याने त्यांना निवडून आणायचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ठाणे : जो पर्यंत जागेचा निर्णय झाला नव्हता. तो पर्यंत पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दावा करणे त्यात काही गैर किंवा चुकीचे काहीच नाही. मात्र आता ठाणे लोकसभेचा निर्णय झाला असल्याने आम्ही जोमाने कामाला लागू असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. त्यात पक्षात आजच्या घडीला कोणीही नाराज नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनोहर सुखदरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरला असला तरी आमचे उमेदवार नरेंद्र मोदी असल्याने त्यांना निवडून आणायचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. महाविकास आघाडीतच बिघाडी असल्याचे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. अनेक ठिकाणी कॉंग्रेस असेल किंवा उध्दव ठाकरे गट असेल यांनी परस्पर उमेदवार दिल्याने त्यांच्या बिघाडी झाल्याचे चित्र आहे. मात्र महायुतीत सुरवातीला दावा केला जात असला तरी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षात कोणीही नाराज झाला नसल्याचे त्यांनी सांगितले, आम्ही एकदिलाने काम करीत असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षांत मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाराष्ट्राचा ६४ वा स्थापना दिन साजरा होताना महाराष्ट्राच्या विकासात अडथळे निर्माण करणाºया उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्याला प्रगतीपथावर नेणारे प्रकल्प कसे बंद पाडले गेले याची मतदारांना आठवण करून देणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.